रविवार ‘खरीदी के नाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:01 AM2017-10-16T01:01:07+5:302017-10-16T01:01:07+5:30
दिवाळीआधीचा रविवार शहरवासीयांनी ‘खरीदी के नाम’ केला. परिवारातील लहानथोरांना कपडे घेण्यापासून ते आकाश कंदिल, लक्ष्मीच्या छायाचित्राची वही, पूजेचे सामान अशी खरेदी जोमात केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळीआधीचा रविवार शहरवासीयांनी ‘खरीदी के नाम’ केला. परिवारातील लहानथोरांना कपडे घेण्यापासून ते आकाश कंदिल, लक्ष्मीच्या छायाचित्राची वही, पूजेचे सामान अशी खरेदी जोमात केली. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा एकदा ग्राहकी पांगते काय, असे व्यापाºयांना वाटत होते; पण दिवसा पाऊस पडला नाही. यामुळे दिलासा मिळाला.
सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. जुन्या पारंपरिक बाजारपेठेप्रमाणेच सिडको-हडको, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, उल्कानगरी, काल्डा कॉर्नर परिसर, उस्मानपुरा, जालना रोड, बीड बायपास रोड या भागातील दुकानांमध्येही गर्दी पाहण्यास मिळाली. शहरातील तिन्ही मॉलमध्येही गर्दीचा उत्साह औरच होता. शहरवासीयांनी रेडिमेड कपडे खरेदीवर आज भर दिला. लहान मुलांचे कपडे पहिले खरेदी केले जात होते. शहरात काही दुकाने अशी आहेत की, तिथे दोन ते तीन दिवसांचे वेटिंग सुरू होते. पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछलीखडक तसेच औरंगपुरा, निरालाबाजार, शहागंज या परिसरातील कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकी उसळली होती. साजन सरिता एन.एक्स.चे इंदरचंद परसवाणी यांनी सांगितले की, पद्मावती पॅटर्न साडीची सध्या क्रेझ आहे. याशिवाय ढोला सिल्क, ड्रेस मटेरियलला मागणी आहे. दुल्हा-दुल्हनचे पंकेश अग्रवाल म्हणाले की, बुटिक डिझाइनर साड्या, मारवाडी कन्सेप्ट साड्या तसेच इर्म्पोटेड फॅब्रीक साड्या व पैठणी प्युअर सिल्कला अधिक मागणी आहे. शिवाजीनगर येथील सरोदे एजन्सीचे दीपक सरोदे यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही सध्या एलईडी टीव्ही खरेदीला पहिली पसंदी दिली जात आहे. एलसीडीचे ग्राहक आता एलईडी टीव्हीकडे वळत आहेत. तसेच विविध बक्षीस योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात खरेदीचा आनंद द्विगुणित होत आहे.