संडे स्पेशल : कार्यान्वित होण्याअगोदरच क्रीडा संकुलाची इमारत मोजतेय शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:06 AM2021-08-27T04:06:02+5:302021-08-27T04:06:02+5:30
सुनील घोडके खुलताबाद : येथील तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीची उभारणी होऊन तब्बल १८ वर्षे झाली आहेत. मात्र, हे क्रीडासंकुल ...
सुनील घोडके
खुलताबाद : येथील तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीची उभारणी होऊन तब्बल १८ वर्षे झाली आहेत. मात्र, हे क्रीडासंकुल कार्यान्वितच न झाल्याने या इमारतीची पुरती दुर्दशा झाली असून इमारत शेवटची घटका मोजत आहे. तसेच क्रीडा संकुलाचे मैदानही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून जिल्हा क्रीडा अधिकारी मात्र झोपेचे साेंग घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे क्रीडाप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खुलताबाद नगर परिषदेच्या मैदानावर सन २००३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते २५ लाख रुपये खर्चाच्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. २००४-५ साली क्रीडा संकुलाची इमारत उभारण्यात आली. यात मोठे इनडोअर खेळ खेळण्यासाठी हॉल व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. मात्र घोडे कुठे अडले, हे समजले नाही. नवीन बांधलेल्या या इमारतीत क्रीडा संकुल सुरू होऊच शकले नाही. तसेच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या इमारतीकडे दुर्लक्ष केल्याने आज १८ वर्षांतच या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक विघ्नसंतोषी लोकांनी या इमारतीची तोडफोड केली आहे. हॉल व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाची प्रचंड प्रमाणात तोडफोड झाली असून दरवाजा, खिडक्या, काचा, फरशी, छतावरील पत्रे फोडण्यात आली आहेत. भिंतींना मोठमोठी भगदाडे पाडण्यात आली आहेत. इमारतीची एवढी दुरवस्था होऊनही जिल्हा क्रीडा विभाग कधी इकडे फिरकतही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या इमारतीची ही तोडफोड केवळ जिल्हा क्रीडा व तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाली असल्याचा आरोप तालुक्यातील क्रीडाप्रेमी करीत आहेत.
चौकट...
दोन एकर मैदानावर भूमाफियांचा डोळा, अतिक्रमणाचा विळखा
तालुका क्रीडा संकुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. करोडो रुपयांची ही जागा असून दोन एकरचे मैदान आहे. याकडे भूमाफियांची नजर असून अनेकांनी मैदानात लाकडे टाकून अतिक्रमण केलेले आहे. कोट्यवधींची ही जागा धोक्यात असून, याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने त्वरित लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी केली आहे.
चौकट
खुलताबादेत खेळण्यासाठी नाही मैदान
क्रीडा संकुलाच्या मैदानाव्यतिरिक्त खुलताबादेत मुलांना खेळण्यासाठी दुसरे मैदानच नाही. या मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा होत होत्या. मात्र आता या जागेवर काहींचा डोळा असून मैदानाच्या जागेवर लाकडे टाकण्यात आलेली आहेत. यामुळे मुलांना येथे खेळता येत नाही.
फोटो कॅप्शन : खुलताबाद येथे २५ लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात आलेले तालुका क्रीडा संकुल शेवटची घटका मोजत आहे.
260821\img_20210826_113159.jpg
खुलताबाद तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीची झालेली दुरावस्था