संडे स्पेशल : पैठणचे खुले कारागृह राज्यातील सर्व कारागृहांना पुरविते अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:06 AM2021-09-04T04:06:31+5:302021-09-04T04:06:31+5:30

संजय जाधव पैठण : १९५७ला प्रदर्शित झालेल्या ‘दो आंखे बारा हात’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाने प्रेरित होऊन जायकवाडी ...

Sunday Special: Paithan's open jail supplies food to all prisons in the state | संडे स्पेशल : पैठणचे खुले कारागृह राज्यातील सर्व कारागृहांना पुरविते अन्नधान्य

संडे स्पेशल : पैठणचे खुले कारागृह राज्यातील सर्व कारागृहांना पुरविते अन्नधान्य

googlenewsNext

संजय जाधव

पैठण : १९५७ला प्रदर्शित झालेल्या ‘दो आंखे बारा हात’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाने प्रेरित होऊन जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी कैद्यांच्या बळाचा वापर मजूर म्हणून करण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. त्यातून १९६७ला पैठण येथे खुले कारागृह सुरू करण्यात आले. या कारागृहातील कैद्यांनी जायकवाडीच्या बांधकामात मोठा वाटा उचलला. आज याच कारागृहातील कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून राज्यभरातील कारागृहात अन्नधान्य पुरविले जाते. मुंबई, पुणे मार्केटमध्ये भाजीपाला पाठवला जातो. क्षणिक रागात हातून गुन्हा घडलेल्या कैद्यांना चांगला माणूस बनवून पुन्हा समाजात पाठविण्याची उद्देशपूर्ती खुल्या कारागृहात सफल होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्याजवळील औंध संस्थानात, औंधच्या पुरोगामी शासकाने आयरिश मानसशास्त्रज्ञांना खुल्या तुरुंगात ठेवलेल्या धोकादायक गुन्हेगारांवर प्रयोग करण्याची मुभा दिली होती. व्ही. शांताराम यांनी यावर पटकथा तयार करून ‘दो आंखे बारा हात’ या चित्रपटाची निर्मिती केली. पुढे या चित्रपटाने कैद्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होऊन खुल्या कारागृहाची संकल्पना समोर आली. तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगार बनू नये म्हणून, तुरुंगात संबंधित कैद्यांवर संस्कार व्हावेत, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला पोट भरता येईल, असे रोजगार प्रशिक्षण त्याला कारागृहात मिळावे, असे विचार विविध समाजशास्त्रज्ञ २०व्या शतकात शासनकर्त्यांसमोर मांडत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पैठणचे भूमिपुत्र कै. शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी धरणाच्या बांधकामासाठी कैद्यांचे बळ उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यातील सर्वात मोठे खुले कारागृह पैठण येथे सुरू झाले.

जायकवाडी धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पैठण येथील खुले कारागृह पुढे चालू ठेवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. जायकवाडी धरणासाठी संपादित केलेली ४२९ हेक्टर जमीन करारावर जलसंपदा विभागाकडून कारागृह प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. या जमिनीत कैद्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात येते. कारागृहातील यंत्रमाग, लोहारकाम, धोबीकाम, सुतारकाम इत्यादी प्रशिक्षण विभागात बरेच बंदी प्रशिक्षित झाले. कारागृहातून सुटल्यानंतर स्वतःचा व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्यांना याचा उपयोग झाला. कारागृहात गांडूळखत प्रकल्प, सेंद्रिय खत प्रकल्प, कम्पोस्ट खत प्रकल्प राबविण्यात येतात. उत्पादित खत कारागृहाच्या शेतीत वापरण्यात येते. सदर खत कसे तयार करावे, याचे बंदींना प्रशिक्षण देण्यात येते. कारागृह शेतीत वापरून उर्वरित खताची बाजारात विक्री करण्यात येते. या प्रकल्पामुळे बंदी प्रशिक्षणाबरोबर कारागृहास उत्पन्नदेखील मिळते.

Web Title: Sunday Special: Paithan's open jail supplies food to all prisons in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.