संडे स्पेशल : धार्मिक विधिसाठी आलेल्या नागरिकांची पैठणमध्ये लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:00+5:302021-09-18T04:06:00+5:30

पैठण : ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख असलेल्या पैठण शहरात गोदावरी काठावर धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे ...

Sunday Special: Robbery of citizens who came for religious ceremonies in Paithan | संडे स्पेशल : धार्मिक विधिसाठी आलेल्या नागरिकांची पैठणमध्ये लूट

संडे स्पेशल : धार्मिक विधिसाठी आलेल्या नागरिकांची पैठणमध्ये लूट

googlenewsNext

पैठण : ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख असलेल्या पैठण शहरात गोदावरी काठावर धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्राधिकरणातून २० कोटी रुपये खर्चून नाथमंदिर परिसरात मोक्षघाट बांधण्यात आला; परंतु या घटावर कुठल्याच शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने घाटावर मोठी अनागोंदी सुरू आहे. श्राद्ध विधीसाठी आलेल्या नागरिकांना जमेल तसे लुटण्याचे प्रकार मोक्षघाटावर दिवसाढवळ्या घडत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोक्षघाटावर खासगीकरणातून नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते. या नद्यांच्या परिसरातच संस्कृतीचा जन्म व विकास झाला. दक्षिण भारतात गोदावरी परिसरात संस्कृती रूजली, पैठण शहरात गोदावरी पित्रमुखी (दक्षिण मुखी) वाहते म्हणून दक्षिणेतील काशी म्हणून पैठण नगरीचे महत्व आजही अबाधित आहे. गावाच्या वेशीत किंवा काशीत मरण आले, तर मोक्ष मिळतो, ही धारणा फार पुरातण काळापासून रूजलेली आहे. त्यातूनच पुढे मृत्यू झाल्यानंतर विधी करून रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा सुरू झाली. यामुळे पैठण शहरातील गोदावरी तीरावर पिंडदान, दशक्रिया विधी, अस्थिविसर्जन, सिंहस्थविधी, कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नियमित सुरू आहेत. विधी करण्यासाठी सकाळी ७ ते २ या दरम्यान सात ते आठ हजार नागरिक रोज पैठण शहरातील मोक्षघाटावर हजेरी लावतात.

पैठण शहरातील मोक्षघाटावर सरासरी १०० विधी केले जातात. एका विधीसाठी ९ ते १० हजार रुपयांपर्यंत साहित्य खरेदी होते. ब्राह्मण, केस कापणारे, परिसरातील मठ, भोजन करणारे आचारी, किराणा दुकाने, हॉटेल, रिक्षा, पूजा साहित्य विकणारे, आदी सर्वांना रोजगार मिळतो. यातून दैनंदिन १० ते १२ लाख रुपयाची उलाढाल होते. शिवाय राखेतून सोने शोधणाऱ्यांनाही उत्पन्न मिळते. यामुळे पैठण शहरातील अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा मोक्षघाटावरील विधीचा आहे. मात्र येथे नियोजन नसल्याने

परिसरात विधीसाठी आलेल्यांची नोंद घेतली जात नाही. पोलीस बंदोबस्त तैनात नाही. या परिस्थितीमुळे दु:खात विधीसाठी आलेल्या नागरिकांना लुटण्याचे सर्रास गैरप्रकार सुरू आहेत. प्रसंगी रक्षा हातातून ओढून नेणे, कपडे चोरून नेणे आदी प्रकार सातत्याने येथे घडताना दिसत आहेत.

मोक्षघाट बीओटी तत्वावर चालविण्यास दिल्यास तेथे नियंत्रण व्यवस्था उपलब्ध होऊन नगर परिषदेला उत्पन्न मिळेल यामुळे या घाटाचे न. प. ने खाजगीकरण करावे अशी मागणी होत आहे.

चौकट...

वीस कोटी खर्चून बांधला मोक्षघाट

पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून २० कोटी रूपये खर्चून मोक्षघाट बांधण्यात आला. यानंतर अलिकडे हा घाट नगर परिषद पैठण कडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र एकवेळच्या सफाई पलीकडे येथे न.प. काहीही करत नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही. महिलांना वस्र बदलण्यासाठी केलेल्या कक्षास दरवाजे नाहीत.

फोटो : पैठण शहरातील गोदावरी काठावर दशक्रिया विधीसाठी असे हजारो नागरिक उपस्थित असतात.

Web Title: Sunday Special: Robbery of citizens who came for religious ceremonies in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.