रविवार ‘ब्लॅक डे’ ठरला
By Admin | Published: May 16, 2016 12:15 AM2016-05-16T00:15:38+5:302016-05-16T00:21:55+5:30
औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्शिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते.
औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्शिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते. ‘वाढलेल्या पाऱ्याचा’ सर्वाधिक फटका रविवारच्या आठवडी बाजाराला बसला. ग्राहकांनी तर पाठ फिरविलीच. विक्रेत्यांनाही भरदुपारी आपला गाशा गुंडाळावा लागला.
गरिबांचा ‘निराला’ बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाफरगेट येथील आठवडी बाजारात आज वर्दळ अजिबात नव्हती. उन्हाचा पारा चढल्याने दुपारी तुरळक प्रमाणात ग्राहक बाजारात आल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, हार्डवेअर विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेनंतर गाशा गुंडाळणे सुरू केले. आजचा रविवार आमच्यासाठी ‘ब्लॅक डे’ ठरला, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. सेकंड हँड टीव्ही विक्रेत्यांची बोहणीसुद्धा झाली नव्हती.
रस्ते निर्मनुष्य; पारा उतरेना
औरंगाबाद : मे महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढत आहे. उन्हाच्या पाऱ्याने मेच्या सुरुवातीलाच चाळिशी ओलांडली. तरीही तापमान आतापर्यंत चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपासच होते. रविवारी शहराचे तापमान ४२.४ अंश सेल्शिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर दिसून येत आहे. उन्हाच्या तप्त झळा सहन होत नसल्यामुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे दुपारी १ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान शहरातील रस्ते सुनसान दिसत आहेत. नेहमी वर्दळीच्या क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, कॅनॉट गार्डन, सिडको, हडको भागांत रविवारी वाहनांसह नागरिकांची वर्दळ घटली होती. असह्य उन्हामुळे नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. उन्हामुळे बाजारपेठेतील गर्दीही कमी झाली आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की, दुपारच्या वेळी ठिकठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळल्याचे दिसून येत होते.