कॅन्सर रिसर्च सेंटरचे रविवारी उद्घाटन
By Admin | Published: August 25, 2016 12:42 AM2016-08-25T00:42:09+5:302016-08-25T00:54:24+5:30
जालना : येथील डॉ. कृष्णा राख मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटर, हृदय शस्त्रक्रिया विभाग तसेच बर्न्स युनिटचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते
जालना : येथील डॉ. कृष्णा राख मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटर, हृदय शस्त्रक्रिया विभाग तसेच बर्न्स युनिटचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते रविवारी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती दीपक हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. संजय राख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती राहाणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांची उपस्थिती असेल. डॉ. राख म्हणाले, अत्याधुनिक असे हे कर्करोग रुग्णालय उभारण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील रुग्णांच्या दृष्टिने हे नवीन हॉस्पिटल महत्वपूर्ण ठरणार आहे. या अत्याधुनिक कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये रेडिएशन आॅन्कोलॉजी अल्ट्रासाऊंड बेस, आयजीआरटी रेडिएशन थेरपी देशात प्रथमच या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेडिकल आॅन्कोलॉजी (केमोथेरपी उपचार) सर्जिकल आॅन्कोलॉजी (कर्करोगावरील शस्त्रक्रिया) प्रिव्हेंटीव्ह आॅन्कोलॉजी(कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजना) आदी सुविधा या सुसज्य रुग्णालयात मिळणार आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी राहण्याची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र अतिथीगृह सुद्धा उभारल्याचे डॉ. राख यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना उपलब्ध असल्याने गरजू रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली विनामूल्य उपलब्ध होईल.सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. संजय राख, संचालक तथा माजामंत्री शंकरराव राख, डॉ. अनुराधा राख, डॉ. एम. बी. सानप, अविनाश कुटे यांनी केले आहे.