‘सुनियो जी अरज म्हारी...’ या गाण्याने झाली माझ्या आयुष्याची सुरुवात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 07:39 PM2018-11-26T19:39:40+5:302018-11-26T19:39:50+5:30
वयाच्या बाराव्या वर्षी जेव्हा दिल्लीला पहिल्यांदा स्पर्धेसाठी आले होते तेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांची ‘सुनियो जी अरज म्हारी...’ ही रचना गायले
औरंगाबाद : वयाच्या बाराव्या वर्षी जेव्हा दिल्लीला पहिल्यांदा स्पर्धेसाठी आले होते तेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांची ‘सुनियो जी अरज म्हारी...’ ही रचना गायले आणि या गाण्याने मला आयुष्यातील पहिले बक्षीस मिळवून दिले. त्यानंतर रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आले तेव्हा परीक्षक म्हणून आलेल्या आनंदजी यांनीही मी गायलेल्या या गाण्याचे कौतुक केले. या स्पर्धेसाठीचा जो ‘प्रोमो’ तयार करण्यात आला होता, त्यातसुद्धा मी हे गाणे गायले. आजही तो प्रोमो अनेकांच्या लक्षात आहे. त्यामुळे या गाण्यामुळेच माझ्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, असे वाटते.
श्रेया घोषाल... आपल्या जादुई आवाजाने रसिकांना मोहित करणाऱ्या या गायिके ने तिच्या गाण्याएवढ्याच तरल आणि सुरेल पद्धतीने तिचा गायिका म्हणून सुरू असणारा प्रवास मांडला. ओहियो सिटी आणि लंडनमध्ये ‘श्रेया घोषाल दिन’ साजरा केला जातो, मादाम तुसा संग्रहालयात मेणाचा पुतळा असणारी श्रेया एकमेव भारतीय गायिका आहे. एवढे यश असतानाही, तिच्या वागण्यातला साधेपणा, सात्त्विकता अधिक भावून जाते.
बालपण राजस्थानात गेल्यामुळे लहानपणापासूनच राजस्थानी लोकगीतांचे संस्कार झाले. मूळची बंगालची असल्यामुळे बंगाली संस्कृतीत वाढले आणि रवींद्र संगीत ऐकत मोठी झाले, हिंदी गाणे, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत नेहमीच कानावर पडायचे, मुंबईला आल्यावर मराठी गाणी ऐकली.
या सगळ्या गायन पद्धतीचा माझ्याही नकळत माझ्या गायकीवर परिणाम होत होता. त्यामुळेच कदाचित आज वैविध्यपूर्ण गाणी गाणे शक्य झाले आणि यामुळेच मी खऱ्या अर्थाने ‘प्रॉपर इंडियन सिंगर’ आहे, असे सांगत श्रेया दिलखुलास हसली.स्वत: गाण्याची निर्मिती करीत त्यात अभिनय करून व्हिडियो यू-ट्यूब लाँच करण्याचा नवा प्रकार ‘सिंगल इंडिपेंडंट’ नावाने सध्या गाजत आहे.
श्रेयानेही अशा प्रकारातील दोन गाणी केली असून, याबाबत सांगताना ती म्हणाली की, चित्रपटासाठी पार्श्वगायन करताना अनेक बंधने असतात. तिथे व्यावसायिकता अधिक असल्यामुळे गाणे हिटच झाले पाहिजे, असा दृष्टिकोन असतो; पण ‘सिंगल इंडिपेंडंट’ प्रकारात कोणत्याही प्रकारची अडकाठी नसल्यामुळे गायिका म्हणून मुक्तपणे काम करता येते, त्यामुळे या प्रकाराकडे आपण अधिक आकर्षित झालो. मी-टू प्रकाराबद्दल बोलताना श्रेयाने सांगितले की, कोणत्याही प्रकारची पिळवणूक होणे वाईट असून, जर या मोहिमेमुळे महिला बोलत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे.
औरंगाबादचे रसिक कलाप्रेमी
औरंगाबादला मी जेव्हाही आले तेव्हा मला येथील रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. येथील लोक कलाप्रेमी असून, त्यांना संगीताची चांगली जाण आहे, असे श्रेयाने सांगितले. मराठी संगीतातील अनुभव सांगताना ती म्हणाली की, मराठी गीतांमध्ये गोडवा असून, येथील गाणी व्यावसायिकतेबरोबरच अधिक कलात्मकही होत आहेत.
हे तर चाहत्याचे प्रेम
आजारी असूनही म्युझिकल कॉन्सर्टमध्ये तुफान गाणी गाऊन जाणाऱ्या श्रेयाचा किस्सा प्रसिद्ध आहे. ही ऊर्जा कुठून मिळते, असे विचारताच श्रेया प्रांजळपणे म्हणाली की, हे केवळ चाहत्यांचे प्रेम आणि संगीताची ताकद यामुळेच शक्य आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकवटतात, तेव्हा देवालाही तुमचे म्हणणे ऐकावेच लागते.