नायलॉन मांजाविरुद्ध सुओमोटो याचिका; विकणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे खंडपीठाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:07 PM2020-12-31T17:07:04+5:302020-12-31T17:15:56+5:30
Suomoto petition against nylon thread in Aurangabad Highcourt नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने सुओमोटो याचिका दाखल
औरंगाबाद : पतंगाच्या दुकानावर गुरुवारी (दि.३१) दिवसभरात धाडी टाकण्याचे आणि नायलॉन मांजा सापडल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्या. रवींद्र व्ही.घुगे आणि न्या .व्ही.व्ही.कंकणवाडी यांच्या खंडपीठाने पोलीस प्रशासनास दिले.
दिवसभरात किती नायलॉन मांजा जप्त केला याचा अहवाल सादर करा. तसेच नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. अॅड. सत्यजित बोरा यांची न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून नेमणूक केली आहे . याचिकेवर १ जानेवारीला सुनावणी होणार आहे . नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिलेचा गळा चिरल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातमीची खंडपीठाने ३० डिसेंबरला स्वतःहून दखल घेतली होती .
राज्य शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे .राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने जुलै २०१७ पासून देशभरात नायलॉन मांजावर बंदी घातली आहे .नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी जखमी होतात असे पक्षीतज्ञ् दिलीप भगत यांनी म्हटल्याचा उल्लेख खंडपीठाने केला आहे. याचिकेत राज्य शासन , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी ,पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि मनपा प्रशासक यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. मुख्य सरकारी वकील डी.आर.काळे आणि सहायक सरकारी वकील यादव लोणीकर प्रतिवाद्यांतर्फे , मनपातर्फे अॅड. आनंद भंडारी काम पाहत आहेत.