कार्यालयातील महिलेनेच दिली ‘सुपारी’; व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला आठ तासांत बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 07:33 PM2022-03-19T19:33:58+5:302022-03-19T19:34:37+5:30
रचनाने कार्यालयात जाऊन पाटील एकटेच असल्याची खात्री केल्यानंतर रोहितला मिस कॉल दिला.
औरंगाबाद : समर्थनगरात प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याला त्याच्याकडे कामाला असलेल्या महिलेनेच सुपारी देत लुटल्याचे स्पष्ट झाले. या टोळीतील चार आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने आठ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल परत मिळविला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
समर्थनगरात स्कायलाईन पार्क बिल्डिंगमध्ये अशोक पाटील यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात बुधवारी दुपारी दोन जणांनी पाटील यांना मारहाण करून हातपाय बांधून ११ तोळे सोन्याचे दागिने लुटले होते. पाटील यांनी त्यांच्या कार्यालयातील रचना तुळशीराम निंभोरे (रा. भाग्योदयनगर, सातारा परिसर) हिच्यावर संशय व्यक्त केला होता. क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. रचनाची माहिती घेत सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. रचनाने मित्र नदीम खान नजीर खान (रा. शम्सनगर, शहानूरवाडी ) याच्यामार्फत पाटील यांना लुटण्याची सुपारी दिली होती. लुटीतील सोन्यात रचना ४० टक्के, नदीम खान २० टक्के आणि सुपारी घेतलेले रोहित विठ्ठल बोर्डे आणि विवेक अनिल गंगावणे (दोघे, रा. गल्ली नंबर ३, उस्मानपुरा) यांचा वाटा ४० टक्के देण्याचे ठरले.
रचना ही पाटील यांना लुटण्याची संधी शोधत होती. बुधवारी दुपारी रचनाने रोहितला फोन करून आज मोहीम फत्ते करण्याच्या सूचना केल्या. रचनाने कार्यालयात जाऊन पाटील एकटेच असल्याची खात्री केल्यानंतर रोहितला मिस कॉल दिला. ठरल्यानुसार रोहित व विवेक यांनी कार्यालयात येत पाटील यांचे हातपाय बांधून सोने लुटले. सोने लुटल्यानंतर आरोपींनी लासूर स्टेशन गाठले. पोलिसांनी रचनाला ताब्यात घेतल्यानंतर तिच्या मोबाईलवरून रोहितला सोन्याची वाटणी करण्याविषयी विचारले. तेव्हा तो घरी आला.