सुपर..! जगभरापेक्षा छत्रपती संभाजीनगरात कॅन्सरला हरविणारी बालके जास्त
By संतोष हिरेमठ | Published: February 15, 2024 07:17 PM2024-02-15T19:17:12+5:302024-02-15T19:17:48+5:30
मृत्यूचे प्रमाण अगदी कमी : कर्करोगावर मात करून सुखरूप राहणाऱ्या बालकांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर
छत्रपती संभाजीनगर : जगभरात कॅन्सरला सामाेरे जाणाऱ्या बालकांचे जगण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. मात्र, हेच प्रमाण शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात ९२ टक्के आहे. म्हणजे कॅन्सरला सामोरी जाणारी ९२ टक्के बालके या महाभयंकर आजाराचा पराभव करून सर्वसामान्यांप्रमाणे जगत आहेत.
दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी जागतिक बाल कर्करोग दिन पाळण्यात येतो. यानिमित्त बाल कर्करोग याविषयी जनजागृती केली जाते. काही वर्षांपासून बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखू, सिगारेटमुळे मोठ्यांना कॅन्सर होतो. पण, मुलांना ही शिक्षा का, असा प्रश्न बाल मनाला पडतो.
मुलांमध्ये कोणता कॅन्सर सर्वाधिक?
मुलांमध्ये रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. मेंदू, किडनी, लिव्हर, डोळे, हाडांचा देखील कॅन्सर आढळतो. अनुवांशिकता, पेशींमध्ये होणारे जनुकीय बदल, जंतुनाशके, कीटकनाशके, रसायने यांचा वाढलेला वापर, काही जन्मजात आजार ही मुलांमधील कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत.
तीन वर्षांत किती मुलांना कॅन्सर?
गेल्या तीन वर्षांत नवीन ४६१ बाल कर्करोगी शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल झाले. एका ६ महिन्यांच्या मुलीला किडनीच्या कॅन्सरचे निदान झाले. चौथ्या स्टेजमधील या चिमुकलीची प्रकृती स्थिर आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील बाल कर्करोग रुग्णांची स्थिती
वर्ष - ओपीडी - आयपीडी - नवीन बालरुग्ण- मृत्यू- कॅन्सरवर मात करणारे
२०२१-३,५८१-१,८७०-१४४-१०-९३ टक्के
२०२२-३,७११-१,९३०-१५५-११-९२.५ टक्के
२०२३-३,८२२-२,०२१-१६२-१२-९२ टक्के
लवकर निदान महत्त्वाचे
१८ वर्षांखालील मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, ८० टक्के बाल कर्करोग रुग्ण उपचाराने बरे होतात. त्यासाठी लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत. अगदी हसतखेळत या गंभीर आजारावर उपचार शक्य आहेत. उपचार सुरू असताना शहरात राहण्याची मोफत सुविधाही पडेगाव येथे उपलब्ध आहे. बालकांच्या उपचारासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि दाते देखील खंबीरपणे उभे राहतात.
- डाॅ. तुषार इधाटे, बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ.
सर्वांच्या प्रयत्नांतून यश
जगभरात बाल कर्करोगाच्या रुग्णांचे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. मात्र, शासकीय कर्करोग रुग्णालयातील बाल कर्करोग विभागात हे प्रमाण ९२ ते ९३ टक्के आहे. याचा आनंद आहे. डीएम बाल कर्करोग शास्त्र या अतिविशेषोपचार अभ्यासक्रमासाठी दाखल झालेले विद्यार्थी, सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य. अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले उपचार, सुविधा देत आहेत. डाॅ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय काम करीत आहे.
- डाॅ. आदिती लिंगायत, बाल कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.