महाराष्ट्राने उन्हाळ्यात फस्त केले २ हजार ५०० कोटींचे आइस्क्रीम, कोणते शहर प्रथम क्रमांकावर?

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 12, 2024 04:05 PM2024-06-12T16:05:25+5:302024-06-12T16:55:56+5:30

आइस्क्रीम उद्योगासाठी उन्हाळा राहिला ‘सुपर कूल’

Super cool! 2500 crore ice cream in Maharashtra during the summer | महाराष्ट्राने उन्हाळ्यात फस्त केले २ हजार ५०० कोटींचे आइस्क्रीम, कोणते शहर प्रथम क्रमांकावर?

महाराष्ट्राने उन्हाळ्यात फस्त केले २ हजार ५०० कोटींचे आइस्क्रीम, कोणते शहर प्रथम क्रमांकावर?

छत्रपती संभाजीनगर : यंदाचा उन्हाळा सर्वांत कठीण राहिला... सरासरी पारा ४० ते ४५ अंश दरम्यान जाऊन पोहोचला होता... प्रचंड उकाड्याने जनजीवनही प्रभावित झाले होते... विविध स्वादिष्ट आइस्क्रीमचा आस्वाद घेत शरीर ‘थंडा-थंड कूल कूल’ ठेवले जात होते. उष्णता जेवढी जास्त ते वातावरण आइस्क्रीम उद्योगासाठी ‘सुपर कूल’ ठरते... यामुळेच, मागील चार महिन्यांत महाराष्ट्रात आइस्क्रीम विक्रीत तब्बल २५०० कोटींची उलाढाल झाली. एवढी उलाढाल आजपर्यंतचा उच्चांक मानली जात आहे.

आइस्क्रीम आवडत नाही, असे म्हणणारे लोक खूप दुर्मीळ असतील. आबालवृद्ध आइस्क्रीम दिसले की ते कधी एकदा फस्त करू असेच वाटत असते. जेवढा उन्हाळा कडक, तेवढी आइस्क्रीमची विक्री जास्त हे उद्योगातील गणित ठरलेले आहे. यंदा तसेच घडले. कोरोना काळात आइस्क्रीम उद्योगाला मोठा फटका बसला होता. मात्र, ते नुकसान भरून काढत हा उद्योग ‘नफ्यात’ आला आहे.

आइस्क्रीम उद्योगातील राज्यातील उलाढालीची वाढती आकडेवारी
फेब्रुवारी ते मे महिना

वर्ष             उलाढाल
२०२२- १२०० कोटी
२०२३- १५०० कोटी
२०२४- २५०० कोटी

हजार कोटीने उलाढाल वाढली
यंदाचा उन्हाळा सर्वाधिक दाहक ठरला. राज्यातील तापमान ४० ते ४५ अंश दरम्यान राहिले. याचा फायदा आइस्क्रीम उद्योगाला झाला. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत २५०० कोटींची उलाढाल झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

कोरोना काळात एक हजार कोटींचा फटका
महाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाला वर्ष २०२१ मध्ये कोरोनामुळे सुमारे ८०० ते एक हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.

राज्यात किती आइस्क्रीम उद्योग
महाराष्ट्र राज्यात आजघडीला लहान-मोठे आइस्क्रीमच्या ३५० कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल ५० लाखांपासून कोट्यवधीपर्यंतची आहे.

आइस्क्रीम विक्रीत पुणे नंबर वन
राज्यात सर्वाधिक आइस्क्रीम पुण्यात विक्री होते. त्यापाठोपाठ मुंबई, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरचा नंबर लागतो.

वार्षिक उलाढाल तीन हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची आशा
पूर्वी हंगामातच आइस्क्रीम खाल्ले जात होते, पण आता वर्षभर आइस्क्रीमची विक्री होते. हंगामात राज्यात २५०० कोटींची उलाढाल झाली आहे. संपूर्ण वर्षभरात तीन हजार कोटींपर्यंत आइस्क्रीमची उलाढाल पोहोचेल. राज्यात आइस्क्रीमचे उत्पादन होते, याशिवाय गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातूनही आइस्क्रीम विक्रीला येत आहे. दुधापासून आइस्क्रीम बनत असल्याने आइस्क्रीम उद्योगावर १८ टक्के लागणारा जीएसटी कमी करावा, अशी मागणी आहे.
अनिल पाटोदी
- अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

Web Title: Super cool! 2500 crore ice cream in Maharashtra during the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.