‘सुपर’! छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:52 PM2024-08-27T17:52:56+5:302024-08-27T17:54:17+5:30
नव्याने ‘डीपीआर’ तयार करणे सुरू; सध्याची पीटलाइन होणार २४ बोगींची, सोबत आखणी एक नवीन पीटलाइन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रेल्वे मार्ग करण्यासाठी ‘डीपीआर’ तयार करण्यात आला. परंतु, हा ‘डीपीआर’ एकेरी मार्गाचाच असल्याने दुहेरी रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना आली. त्यानुसार दुहेरी रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत तो पूर्ण होईल. या रेल्वेमार्गात १३ रेल्वे स्टेशन राहतील, अशी माहिती खा. डाॅ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
खा. डाॅ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रेल्वे स्टेशनवर रेल्वेप्रश्नांसंदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार, निरज अग्रवाल, मध्य रेल्वेचे आर. के. यादव, अनंत बोरकर, आदी उपस्थित होते. या बैठकीविषयी डाॅ. कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रेल्वे स्टेशनवर सध्या सुरू असलेल्या १६ बाेगीच्या पीटलाइनचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ही पीटलाइन पुढे २४ बोगींची होईल. मालधक्का दौलताबादला स्थलांतरित झाल्यानंतर बाजूलाच आणखी एक पीटलाइन होईल, अशी माहिती डाॅ. कराड यांनी दिली.
वांबाेरीमार्गे जाईल रेल्वेमार्ग, हे राहणार स्टेशन
छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर हा रेल्वेमार्ग वांबोरीमार्गे जाईल. यातून डोंगराचा अडथळा येणार आहे. साजापूर - आंबेलोहोळ - येसगाव - बाबरगाव - गंगापूर- जामगाव - देवगड - नेवासा - उस्थल दुमला - खारवांडी - शनिशिंगणापूर- मोरे चिंचोरे- ब्राह्मणी हे स्टेशनही राहतील.
बीड- पैठण- छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव रेल्वेमार्गासाठी प्रयत्न
बीड-पैठण-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वेरुळ-कन्नड- चाळीसगाव रेल्वेमार्ग हे इकोनाॅमिक इंटर्नल रेट ऑफ रिटन (ईआयआरआर) च्या माध्यमातून करावे, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली जाईल, असेही डाॅ. कराड यांनी सांगितले.
हेही होणार...
- रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीत रेल्वे रुळावर ५० हजार स्के. फूटचे छत, विमानतळाप्रमाणे कमर्शियल शाॅप, रेस्टाॅरंट, चार दादरे.
- नव्या इमारतीत वेरुळ लेणीसह ऐतिहासिक स्थळांचे स्वरूप देणार.
- मुकुंदवारी रेल्वे स्टेशनचाही विकास करणार.
- अंकाई (मनमाड)- छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे ९६४ कोटींतून दुहेरीकरण.
- उस्मानपुरा रेल्वेगेटवर भुयारी मार्ग, रेल्वे स्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल होईल. ‘डीपीआर’साठी ७० कोटी.
- दौलताबाद येथे मालधक्क्यासाठी ९ एकर जागा मिळाली, आणखी ३ एकर मिळणार.
- भांगसी माता गड रस्त्यावरील रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू.
- गणेशनगर येथे रेल्वे रुळावर स्लॅब टाकून मार्ग करणार. शिवाजीनगरवासीयांना होईल फायदा.
- लासूर स्टेशन येथे दोन भुयारी मार्ग.