सुपर! आता छत्रपती संभाजीनगरात ‘रोबोटिक’ने होईल कॅन्सर सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:11 PM2024-07-30T20:11:33+5:302024-07-30T20:11:51+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालय : ३२ कोटी रुपयांच्या ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज’ खरेदीस मंजुरी
छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) लवकरच रोबोटिक कॅन्सर सर्जरीला सुरुवात होणार आहे. रुग्णालयातील गायनाॅकोलाॅजी ऑन्कोलाॅजी विभागास ३२ कोटी रुपयांची ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम विथ ॲक्सेसरीज’ खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मराठवाड्यासह राज्यभरातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी शासकीय कर्करोग रुग्णालय आधारवड ठरत आहे. येथील सोयीसुविधांमध्ये वाढ होत असून, या ठिकाणी लवकरच रोबोटिक सर्जरीचाही ‘श्रीगणेशा’ होणार आहे. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड हे रुग्णसेवावाढीसाठी प्रयत्नशील आहेत. ‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’मुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल, असे डाॅ. अरविंद गायकवाड म्हणाले.
रोबोटिक सर्जरीचा फायदा
‘रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’मधील लवचीक असे रोबोटिक हात आणि उपकरणांमुळे शस्त्रक्रियेत अचूकता वाढते. शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी होते. त्यामुळे शस्त्रक्रिया सहजतेने आणि अचूकतेने करता येते. या आधुनिक तंत्रज्ञानाने एक तज्ज्ञ सर्जन हा रोबोटिक आर्मद्वारे थ्रीडी व्हिज्वलायझेशनच्या मदतीने शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत जलद गतीने सुधारणा होते. रुग्णालयात कमी दिवस थांबावे लागते.
कोणत्या शस्त्रक्रिया होतील?
गायनाॅकोलाॅजी ऑन्कोलाॅजी विभागाच्या प्रमुख डाॅ. अर्चना राठोड म्हणाल्या, नियमित सर्जरीत (ट्रॅडिशनल), ओपन सर्जरीत आणि विशेषत: कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला मोठी चीर द्यावी लागते. परंतु रोबोटिक सर्जरीत खूप छोट्या छिद्रातून आणि थ्रीडी कॅमेऱ्याद्वारे कॅन्सर सर्जरी सहजतेने करणे शक्य होते. रोबोटिकद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करता येतील. कॅन्सरमुळे गर्भाशय, अंडाशय काढता येईल. अतिशय लठ्ठ महिलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही रोबोटिकद्वारे सहजतेने करता येईल.