'सुपर संभाजीनगर'; स्मार्ट सिटीच्या नवीन फलकाने शहरात वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:22 PM2020-12-21T12:22:03+5:302020-12-21T12:25:14+5:30
Controversy over the sign board in Aurangabad शहरातील प्रत्येक चौकाचे आणि परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावण्याचे काम स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे.
औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रशासनाने शनिवारी टीव्ही सेंटर चौकात ''सुपर संभाजीनगर'' या नावाने आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावला. त्यामुळे शहरात नवीन वादाला सुरुवात झाली. शहराच्या नामांतराला सर्वोच्च न्यायालयापर्यंत विरोध करणाऱ्या मंडळींनी कडाडून विरोध सुरू केला आहे. मात्र, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व आरोपांचा इन्कार करीत शहराच्या पर्यटनवाढीसाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक चौकाचे आणि परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावण्याचे काम स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे. आतापर्यंत स्मार्ट सिटी सिडको एन-१ येथे ''लव्ह औरंगाबाद'' नावाने फलक लावला. या फलकाचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. जालना रोड येथे ही अशाच पद्धतीचे फलक लावण्यात आले आहेत. खडकेश्वर भागात ''लव्ह खडकी'' नावाने बोर्ड लावण्यात आला. शनिवारी टीव्ही सेंटर चौकात ''सुपर संभाजीनगर'' या नावाने बोर्ड लावण्यात आला. सोशल मीडियावर हा बोर्ड झळकताच तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. रविवारी एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर या कृतीला कडाडून विरोध केला. शिवसेनेचे आ. अंबादास दानवे यांनी दुपारी समर्थन केले.''लव्ह औरंगाबाद'' ला आम्ही विरोध दर्शविला नाही. ''सुपर संभाजीनगर''ला विरोध कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मनपाकडून माहिती घेऊन बोलता येईल
सध्या तरी याबाबत काही बोलता येणार नाही. महापालिकेकडून या प्रकरणात माहिती घेऊनच सांगता येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
कायदेशीर लढाई लढण्यास सज्ज
१९९० च्या दशकात औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्कालीन शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारने काढलेली अधिसूचना मागे घेतली होती. आतापर्यंत स्मार्ट सिटी सारख्या प्रशासनाकडून अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत.
- मुस्ताक अहमद, सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते.
शहराच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्न
स्मार्ट सिटी आणि खासगी संस्थेच्या सहकार्याने लावण्यात येत असलेल्या बोर्डवरून कोणताही वाद निर्माण झालेला नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात त्या परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन अशा पद्धतीचे बोर्ड तयार करण्यात येत आहेत. शहरात येणाऱ्या पर्यटकांना चांगले वाटावे, पर्यटन वाढावे, औरंगाबादकरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत.
- आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक मनपा.