तंत्रकौशल्याच्या शिक्षणातून घडविले ‘सुपर ट्वेंटी टू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:32 AM2019-07-15T05:32:14+5:302019-07-15T05:32:17+5:30
आयआयटीचे द्वार खुले करून देणाऱ्या ‘सुपर थर्टी’ या चित्रपटाप्रमाणेच औरंगाबादेत ‘सुपर टट्वेंटी टू’ तरुण तंत्रकौशल्याच्या आधारे रोजगार मिळवू लागले आहेत
औरंगाबाद : सामान्य विद्यार्थ्यांना आयआयटीचे द्वार खुले करून देणाऱ्या ‘सुपर थर्टी’ या चित्रपटाप्रमाणेच औरंगाबादेत ‘सुपर टट्वेंटी टू’ तरुण तंत्रकौशल्याच्या आधारे रोजगार मिळवू लागले आहेत. परिस्थितीशी दोन हात करीत पुढे आलेल्या २२ पोलीस पाल्यांना तीन महिन्यांच्या तंत्रशिक्षण प्रशिक्षणामुळे रोजगार मिळाला आहे. औद्योगिक संघटनांनी पुढाकार घेऊन प्रथमच हा प्रयोग मोफत प्रशिक्षण देऊन यशस्वी केला आहे. येथील चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (सीएमआयए), पोलीस वेल्फेअर विभाग, मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), जीआयझेड या संस्थांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून ही किमया साधाली आहे.
पारंपरिक शिक्षण घेतलेले व शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेले २२ पोलीस पाल्य सीएमआयएच्या स्किल हब आणि सोबतच्या संस्थांनी निवडले. यात पाच मुलींचा समावेश आहे. त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देत सीएमआयएने त्यांना तांत्रिक ज्ञान अवगत करून दिले. अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च २०२० मध्ये मिळणाºया प्रमाणपत्राच्या आधारावर हे विद्यार्थी भारतासह परदेशातही नोकरीस पात्र ठरू शकतील. वाळूजच्या मनीष इंजिनिअरिंग आणि पवन इंजिनिअरिंग या कंपन्यांनी या विद्यार्थ्यांना चार महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी रोजगार दिला. सीएनसीसारखी महागडी यंत्रे चालविण्यात या मुलांचे हात आज पारंगत झाले आहेत.
>एम.ए., डी.एड.चे शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती. त्यामुळे सीएनसी मशिनसंबंधीच्या अभ्यासक्रमाकडे वळलो. माझी उपजीविका भागविण्यासाठी मला यातून रोजागार मिळाला. - सचिन तुपे,
औद्योगिक संस्थांनी केलेला पहिला प्रयोग
शिक्षण देण्यासाठी तत्पर असलेल्या, आपल्या पाल्यांसाठी काही करू इच्छिणाºया संस्थांना एकत्र आणून हा प्रयोग केला. तांत्रिक कौशल्य हाती देऊन पोलीस पाल्यांना रोजगाराभिमुख करण्याचा हा कोणत्याही औद्योगिक संस्थेने केलेला पहिला प्रयोग आहे. उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. - आशिष गर्दे (माजी अध्यक्ष, सीएमआयए)