आरोग्य विभागाचा सहायक अधीक्षक लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:04 AM2017-09-23T01:04:13+5:302017-09-23T01:04:13+5:30
५०० रुपयांची लाच घेताना पाचोड (ता.पैठण) येथील आरोग्य विभागाच्या सहायक अधीक्षकाला लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गैरहजर चार दिवसांच्या कालावधीचे कपात झालेले वेतन काढून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना पाचोड (ता.पैठण) येथील आरोग्य विभागाच्या सहायक अधीक्षकाला लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पाचोड येथे ग्राामीण रुग्णालयाच्या लेखा शाखेत २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीच्या सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत.
अनिल गोपीनाथ लोखंडे (५७, रा. पाचोड) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अधीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी हे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत. तक्रारदार हे १५ ते १७ मार्च या कालावधीत प्रशिक्षणासाठी हजर होते. असे असताना चार दिवसांची गैरहजेरी लावून त्यांचे वेतन कापण्यात आले होते. यामुळे प्रशिक्षणासाठी कर्तव्यावर हजर असल्याने चार दिवसांच्या कालावधीतील वेतन काढून द्यावे, अशी विनंती त्यांनी सहायक अधीक्षक लोखंडे यांना भेटून केली. तेव्हा आरोपींनी त्यांना पाचशे रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पाचोड येथे जाऊन २२ सप्टेंबर रोजी दोन पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या कार्यालयाच्या परिसरातच सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेचे पाचशे रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लोखंडे यास रंगेहात पकडले. हा सापळा अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक विकास पाटील, वैशाली पवार, पोहेकॉ राजपूत, गणेश पंडुरे, रवींद्र देशमुख, संतोष जोशी यांनी केली.