औरंगाबाद येथील उच्च शिक्षण सहसंचालकांची सोलापूरला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:05 PM2018-04-12T22:05:10+5:302018-04-12T22:34:50+5:30
उच्च शिक्षण विभागाच्या औरंगाबाद येथील सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांची सोलापूर येथे सहसंचालक म्हणून बदली झाली आहे. तर सोलापूरचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची बदली
औरंगाबाद : उच्च शिक्षण विभागाच्या औरंगाबाद येथील सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांची सोलापूर येथे सहसंचालक म्हणून बदली झाली आहे. तर सोलापूरचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची बदली औरंगाबादला झाली. या फेरबदलाचा शासन निर्णय निघाला आहे.
औरंगाबादच्या उच्च शिक्षण सहसंचालकपदाचा पदभार डॉ. राजेंद्र धामणस्कर यांनी १० डिसेंबर २०१५ रोजी घेतला होता. तत्कालिन सहसंचालक डॉ. मगर यांनी संघटनांच्या आरेरावीला कंटाळून पदाचा राजीनामा देत मुळ ठिकाणी रूजु होण्यास प्राधान्य दिले. यानंतर आलेल्या डॉ. धामणस्कर यांनाही संघटनांनी हैराण करण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीतही त्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ याठिकाण काम केले. मात्र मंत्रालयात झालेल्या घडामोडींमुळे त्यांचा पदभार औरंगाबादेतुनच सोलापूरला गेलेले डॉ. सतीश देशपांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. धामणस्कर यांची बदली होऊन त्याठिकाणी आपल्याला प्रभारी पदभार मिळावा यासाठी पुर्वाश्रमीच्या प्रभारी सहसंचालकांनी मराठवाड्यातील एका मंत्र्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. उलट औरंगाबादसाठी पाण्यात देव घालुन बसलेले डॉ. सतीश देशपांडे यांनी बाजी मारली. सोलापूरला केवळ एकच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. औरंगाबादच्या कार्यक्षेत्रात चार जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच प्रकरणांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे डॉ. देशपांडे यांनीही उच्चस्तरीय सूत्रे हालवत पसंतीच्या ठिकाणी बदली करुन घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उच्च शिक्षण संचालकांकडून बदली आदेश आल्यानंतरच डॉ. धामणस्कर हे पदभार सोडण्याची शक्यता आहे.
प्रीआयएएस सेंटरला संचालक प्रभारीच राहणार
औरंगाबादेतील प्रीआयएएस कोचिंग सेंटरचा प्रभारी पदभार नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. बळीराम लहाने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा पदभार डॉ. एस. जी. गुप्ता यांच्याकडे होता. याविषयी डॉ. लहाणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सोमवारी पदभार स्विकारणार असल्याचे सांगितले.