सुपर पॉवरच्या फरार तीन संचालकांना अटक
By Admin | Published: August 27, 2014 12:04 AM2014-08-27T00:04:15+5:302014-08-27T00:15:54+5:30
सुपर पॉवर कंपनीच्या तीन सभासदांना अखेर मंगळवारी मंठ्याजवळ अटक करण्यात आली.
औरंगाबाद : कमीत कमी कालावधीत गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या सुपर पॉवर कंपनीच्या तीन सभासदांना अखेर मंगळवारी मंठ्याजवळ अटक करण्यात आली.
शिवाजी एकनाथ पौळ (५०), सतीश शिवाजी पौळ (२४, रा. दिग्रस, सेलू, परभणी) व शेषराव लक्ष्मण घुले (४५, रा. तळतुंबा, पाटोदा,सेलू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या महिनाभरापासून हे आरोपी पोलिसांना चकमा देत होते. हे आरोपी इंडिका कारने जालना-मंठा रोडने जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. लगेच गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी मंठ्याजवळ सापळा रचला. सायंकाळी तिघे कारमध्ये जाताना पोलिसांच्या नजरेस पडले. पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील कारही पोलिसांनी जप्त केली आहे.