दारुबंदीसाठी महिलांचा अधीक्षक कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:18 PM2017-07-22T18:18:02+5:302017-07-22T18:20:11+5:30
वांगी रोड येथील अवैध दारु विक्री बंद करावी, या मागणीसाठी शनिवारी महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. पोलीस उपाधीक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
परभणी- वांगी रोड येथील अवैध दारु विक्री बंद करावी, या मागणीसाठी शनिवारी महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. पोलीस उपाधीक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील वांगी रोड परिसरात विना परवाना दारुची विक्री केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून ही दारु विक्री बंद करावी, अशी मागणी या भागातील महिलांची आहे. या भागात शाळा असून लहान मुले, मुलीं तसेच महिलांना दारू पिणा-यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. याबाबत वारंवार तक्रार करूनही हे बंद होत नव्हते.
आज या परिसरातील विश्वासनगर, अंबिकानगर, साईबाबानगर, मातोश्रीनगर आदी भागातील महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. दारु बंदी करा, अशा घोषणा देत कार्यालयातच ठाण मांडले. उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय परदेसी यांनी महिलांसोबत चर्चा केली. या भागातील दारु विक्री बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन परदेसी यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनातील चारही वसाहतीमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी नानलपेठ पोलीस ठाणे आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यातही दारु बंदी संदर्भातील निवेदन देण्यात आले.