पर्यवेक्षकास लाच घेताना पकडले
By Admin | Published: May 23, 2016 11:27 PM2016-05-23T23:27:28+5:302016-05-24T01:07:38+5:30
जालना : किराणा दुकान टाकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणारा जालना नगर पालिकेतील न्यायविधी व कामगार पर्यवेक्षक
जालना : किराणा दुकान टाकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणारा जालना नगर पालिकेतील न्यायविधी व कामगार पर्यवेक्षक सुरेश गंगासागरे याला सोमवारी पालिका कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदाराची बहीण अपंग आहे. तक्रारदारच बहिणीचे व्यवहार पाहतात. तक्रारदाराच्या बहिणीस किराणा दुकान टाकण्यासाठी अपंग विकास महामंडळाकडून कर्ज घ्यावयाचे होते. सदर कर्ज प्रकरणासाठी नगर पालिकेतून ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. तक्रारदार बहिणीसाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र काढण्यासाठी गंगासागरे यांच्याकडे गेले असता त्यांनी ३ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे गंगासागरे यांनी सांगितले. तक्रारदारस लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सोमवारी नगर पालिकेत लाचेचा सापळा लावण्यात आला. गंगासागरे यांनी पंचासमक्ष ३ हजार रूपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई निरीक्षक व्ही.बी.चिंचोले, व्ही.एल.चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, रमेश चव्हाण आदींनी केली.