बीडमध्ये पर्यवेक्षकच पुरवितात ‘कॉपी’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:29 AM2017-11-12T00:29:13+5:302017-11-12T00:29:17+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासुन पदवी परीक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची धावपळ झाल्यानंतर शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासुन पदवी परीक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची धावपळ झाल्यानंतर शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राच्या बाहेर भयाण शांतता होती, तर केंद्रात खुलेआम कॉपी करून विद्यार्थी पेपर सोडवित होते. कॉपी पुरविण्यासाठी पर्यवेक्षकच मदत करीत असल्याचेही धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर आले आहे.
‘बामू’ विद्यापीठाकडून पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याबरोबच शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. शनिवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. बीड शहरात ९ तर ग्रामीण भागात ५० महाविद्यालयांत पदवी परीक्षा घेण्यात येत आहे. बीडमधील ५ महाविद्यालयांध्ये लोकमत चमूने परीक्षा सुरू असताना अचानक भेट दिली. यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.