संकटसमयी आधार! निधनानंतर १०३५ जणांच्या नातेवाइकांना मिळाली विम्याची रक्कम
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 19, 2024 06:03 PM2024-06-19T18:03:36+5:302024-06-19T18:04:16+5:30
तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा काढला का ?
छत्रपती संभाजीनगर : निधनानंतर त्या व्यक्तीची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबाचे झालेले नुकसान कोणी पैशांत मोजू शकत नाही. मात्र, त्या कुटुंबाला त्या वेळेस काही आर्थिक मदत मिळाली तर तेवढा आधार मिळतो... ज्या लोकांनी बँकेत खाते उघडले व ज्यांनी सरकारी योजनेतील विमा रक्कम भरली त्यातील १०३५ खातेदारांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदाराला प्रत्येकी २ लाख रुपये विमा दाव्याची रक्कम मिळाली.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
केंद्राच्या अर्थसंकल्पात २०१५-२०१६ यावर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जाहीर करण्यात आली होती. याअंतर्गत १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तीचे बँकेत खाते आहे त्यांना योजनेत दरवर्षी ४३६ रुपये विम्याचा हप्ता भरावा लागतो. त्या वर्षभरात कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास २ लाखांचा विमा दाव्याची रक्कम देण्यात येते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
केंद्र सरकारद्वारा पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंदाजपत्रकात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उल्लेख केला होता. ज्यांचे बँकेत खाते आहे. त्यांचे वय १८ ते ७० वयोगट दरम्यान आहे. त्यांनी बँकेत २० रुपये वार्षिक हप्ता भरला की, विमा लागू होतो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला २ लाखांचे अर्थसाहाय्य मिळते. अंशिक अपंगत्व आल्यास १ लाखाचे साहाय्य दिले जाते.
जिल्ह्यात काय परिस्थिती ?
विमा योजनेचे नाव--- खातेदार संख्या--- वार्षिक हप्ता.... किती जणांना मिळाली विम्याची रक्कम ?
१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना--- ५५२३३६-----४३६रु---- ८९१
२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना---- १०७२०२३---२०रु----१४४
अपघाती विमा घेतला आहे का ?
जीवनाचे काही खरे नाही. यासाठी केंद्र सरकारच्या विमा योजनेचा आधार घेणे आवश्यक आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबावर जो दु:खाचा डोंगर कोसळतो, अशावेळी आर्थिक आधार मिळावा, आपल्या कुटुंबाला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, ही यामागील भावना आहे. यासाठी आपले ज्या बँकेत खाते आहे तिथे चौकशी करावी व या दोन योजनांत सहभागी व्हावे.
- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक