मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण ओबीसीत वाटेकरी होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:19 PM2020-12-19T13:19:11+5:302020-12-19T13:33:54+5:30
Maratha Reservation, OBC Reservation ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे यापुढे राज्यात समता परिषदेतर्फे मोर्चे काढण्यात येणार नाहीत
औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू करण्यात आलेले मोर्चे आता थांबविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला तसूभरही धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे आजचा औरंगाबाद येथील मोर्चा आभार मोर्चात रूपांतरित करण्यात आला व तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न जाता गुलमंडीवर विसर्जित करण्यात आला. आम्ही मराठा समाजासोबतच आहोत. मात्र, मराठा समाजाने ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी होऊ नये, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी केले.
समीर भुजबळ यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. सकाळपासूनच औरंगपुरा येथील फुले दाम्पत्याच्या पुतळ्याजवळ जिल्हाभरातून येणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. तेथे राजाभाऊ शिरसाठ व नागसेन सावदेकर संचाची क्रांतिगीते कानावर पडत होती. बाजूलाच सभेसाठी उभारण्यात आलेल्या विचारपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ओबीसी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे अर्धपुतळे ठेवण्यात आले होते. विचारपीठासमोर शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत खलील शेख, महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विकास पडवळ, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मनीषा जाधव व साक्षी चोटमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत कुणाल खरात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्यासोबत कार्यकर्ते फोटो काढून घेण्यात समाधान मानत होते.
दुपारी पाऊणच्या सुमारास समीर भुजबळ यांचे औरंगपुरा येथे आगमन झाले. फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत; परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये व ओबीसींची जनगणना तात्काळ व्हावी या मागण्यांसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे-पवार यांनी आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे यापुढे राज्यात समता परिषदेतर्फे मोर्चे काढण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.सभेत बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक यांची भाषणे झाली. समता परिषदेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी प्रास्ताविक केले. संतोष वीरकर यांनी आभार मानले.
मोर्चाच्या अग्रभागी मंठा येथील बंजारा कलापथकाचे गायक नरेंद्र राठोड, रंजना राठोड आदी दहा ते पंधरा महिला बंजारा नृत्य करीत चालत होत्या. पाठोपाठ सीमा नायक नेतृत्वाखालील नाथपंथी गोसावी समाजाचा समूह पारंपरिक वेशभूषेत चालत होता. अनेक वासुदेव पारंपरिक वेशभूषेत आले होते. गजानन सोनवणे या कार्यकर्त्याने अंगावर छगन भुजबळ यांचा फोटो काढून घेतला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ढोल-ताशाच्या गजरात वातावरण चैतन्यमय बनून गेले होते. ‘मी ओबीसी’च्या टोप्या डोक्यावर झळकत होत्या. हातातील तिरंगा झेंड्यावर ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद’ अशी अक्षरे कोरलेली होती. ‘जय ज्योती-जय क्रांती’चा गजर चालू होता. मोर्चा गुलमंडीवर येऊन शांततेत विसर्जित झाला.
पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, निशांत पवार, संदीप घोडके, अशोकसिंग शेवगण, मिर्झा कय्युम नदवी, बाबासाहेब पवार, रामभाऊ पेरकर, शशिकला खोबरे, अनिता देवतकर, सुभद्रा जाधव, सरस्वती हरकळ, सरोज नवपुते, नलिनी गिरमे, अनिता गायकवाड, अरुणा तिडके, हेमा घोडके, रंजना गायके, उज्ज्वला सोनवणे, मुक्ता हेकडे, मंदा घोडके, लता डाके, रामदास मैद, बाबासाहेब पुंड, महेश सत्रे, संजय तांबे, संजय आढाव, अभिमन्यू उबाळे, पैठणचे अनिल जाधव, देवीदास सोनवणे, अमोल तुपे आदींचा या मोर्चात सहभाग राहिला.