पाठिंब्यावरून ‘एमआयएम’मध्ये फूट!
By Admin | Published: January 3, 2017 11:11 PM2017-01-03T23:11:09+5:302017-01-03T23:15:11+5:30
बीड : नगराध्यक्षपदाच्या लढतीत निकराची झुंज देऊन द्वितीय स्थानी राहिलेल्या एमआयएममध्ये आता पाठिंब्यावरुन धुसफूस सुरू झाली आहे.
बीड : नगराध्यक्षपदाच्या लढतीत निकराची झुंज देऊन द्वितीय स्थानी राहिलेल्या एमआयएममध्ये आता पाठिंब्यावरुन धुसफूस सुरू झाली आहे. ९ पैकी ७ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याने ठिणगी पडली आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटविण्याचे पक्षापुढे आव्हान आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीची लढत दिल्यानंतर बक्षीस म्हणून पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची माळ शेख निजाम यांच्या गळ्यात घातली. निजाम यांना उमेदवारी मिळवून देण्यात सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रीस हाश्मी व शेख निजाम यांच्यात आता विरोधी बाकात स्वतंत्रपणे बसायचे की, काकू-नाना आघाडीला पाठिंबा द्यायचा यावरुन दरी वाढू लागली आहे. डॉ. हाश्मी यांनी ७ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला असून, उर्वरित दोघे शेख निजाम गटाचे म्हणून ओळखले जातात. यामध्ये शेख निजाम यांचे बंधू शेख अमर व अन्य एका नगरसेवकाचा समावेश आहे. काकू-नाना आघाडीकडे सर्वाधिक २० नगरसेवक आहेत. आघाडीचे प्रमुख जि.प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी उपनगराध्यक्षपद आघाडीकडेच खेचण्यासाठी एमआयएमला सोबत घेण्याची रणनीति आखली आहे. एमआयएमच्या ७ नगरसेवकांचा स्वतंत्र गट आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असून, तशा हालचाली गतिमान आहेत. मात्र एमआयएममध्ये पाठिंब्यावरुन दोन मतप्रवाह पुढे येत आहेत. त्यामुळे येत्या १० जानेवारी रोजी एमआयएमची भूमिका नेमकी काय असेल? याची उत्सुकता वाढली आहे. अंतर्गत कलहाची हाय कमांडने गंभीर दखल घेतली असून, आ. इम्तियाज जलील यांनी बैठकांच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या. हैदराबादेतच तोडगा निघू शकतो, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)