गोंधळ घालणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी पक्षाचं दुर्लक्षच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:07 PM2020-03-09T15:07:48+5:302020-03-09T15:27:39+5:30
वाघचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितले असताना पक्षाने त्यांना डावलून गोर्डे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळेच वाघचौरे यांचे समर्थक नाराज होते.
औरंगाबाद : गेल्या महिन्यात मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गोंधळ पाहायला मिळाला होता. माजी आमदार संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच गोंधळ घातला होता. त्यांनतर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अद्यापही या कार्यकर्त्यांवर कोणतेही कारवाई झालेली नसल्याने, राष्ट्रवादी पक्षाने याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं बोलले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन नेत्यांचे कार्यकर्ते सभा सुरु असतानाच एकमेकांमध्ये भिडले होते. स्थानिक राजकारण आणि वर्चस्वाच्या भावनेतून हा वाद उफाळल्याचं बोलले जात होते. त्यांनतर संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरला होता. मात्र अशा गोंधळी कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
काय होते प्रकरण?
पैठण येथे राष्ट्रवादीचा काँग्रेसकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये पक्षातील गटबाजी समोर आली. संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना आपले भाषण काही वेळ थांबावावे लागले होते. वाघचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितले असताना पक्षाने त्यांना डावलून गोर्डे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळेच वाघचौरे यांचे समर्थक नाराज होते. हीच नाराजी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण, दोन्ही नेत्यांचे समर्थक समोरा-समोर आले.