सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश
By राम शिनगारे | Published: December 28, 2023 08:10 PM2023-12-28T20:10:40+5:302023-12-28T20:10:40+5:30
१ जानेवारी रोजी सकाळी स्वीकारणार पदभार
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मुदतीत पूर्णवेळ कुलगुरू मिळणार नसल्यामुळे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात येणार आहे. याविषयीचे आदेश बुधवारी सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पूर्णवेळ कुलगुरूंची निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पूर्णवेळ नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी ते डॉ. प्रमोद येवले यांच्याकडून कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्याचवेळी अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदभार डॉ. प्रमोद येवले यांच्याकडून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्याकडे साेपविण्यात आला आहे. डॉ. येवले हे अमरावतीचा पदभार शुक्रवारी (दि. २९) रोजी सकाळी डॉ. माहेश्वरी यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती आहे.
'टॉप फाईव्ह'च्या ४ जानेवारीला मुलाखती
शोध समितीने शिफारस केलेल्या 'टॉप फाईव्ह'मधील पाच जणांच्या मुलाखती ४ जानेवारी २०२४ रोजी राजभवनात आयोजित केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याविषयीचे पत्र संबंधितांना प्राप्त झाले आहेत. त्यात पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढाेले, कोल्हापूरच्या विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, डॉ. विजय फुलारी आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांचा समावेश आहे. यातील कोणता उमेदवार बाजी मारतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.