घाटीत एक दिवसाच्या बाळावरही ऑपरेशन; पण स्वतंत्र पेडियाट्रिक सर्जरी विभागाची प्रतीक्षाच
By संतोष हिरेमठ | Published: November 2, 2023 07:19 PM2023-11-02T19:19:26+5:302023-11-02T19:19:48+5:30
सर्जरी विभागातील डाॅक्टरांच्या खांद्यावर बालकांवरील सर्जरीचा भार, ‘रेफर’चीही वेळ
छत्रपती संभाजीनगर : जन्मत: श्वासनलिका, अन्ननलिका एकमेकांना चिकटलेली असणे, जन्मत: बाळाला शौचाची जागा नसणे, यासह अनेक गुंतागुंतीच्या अवस्थेतील बालकांवर घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया होतात. मात्र, बालकांच्या काही प्रकारच्या शस्त्रक्रिया या सर्जरी विभागातील डाॅक्टर करतात. काही शस्त्रक्रियांसाठी बालकांना मुंबई, नागपूर, पुण्याला रेफर करावे लागते. पेडियाट्रिक सर्जरी विभाग या स्वतंत्र विभागाची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
बालरोग शल्यचिकित्सक आणि बालरोग मूत्रमार्ग शल्यचिकित्सकांची राष्ट्रीय परिषद २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत शहरात होत आहे. घाटी रुग्णालयातील सर्जरी विभागातील डाॅक्टर बालकांच्या अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करीत आहे. मात्र, स्वतंत्र पेडियाट्रिक सर्जरी विभाग सुरू झाल्यास बाल सर्जरीला, बालकांच्या उपचाराला अधिक बळ मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील पहिले बालरोग शल्यचिकित्सक होण्याचा मान केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना जातो. त्यांनीच आता घाटीत पेडियाट्रिक सर्जरी विभाग सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. गंभीर अशा बालकांना नवीन आयुष्य देणारी बालरोग शल्यचिकित्सा ही शाखा आहे. शहरात २७५ हून अधिक बालरोगतज्ज्ञ असून, केवळ १२ बालरोग शल्यचिकित्सक आहेत. मराठवाड्यात २२ बालरोग शल्यचिकित्सक आहेत.
एका युनिटमध्ये महिन्याला १० सर्जरी
घाटीतील सर्जरी विभागात ६ युनिट आहेत. एका युनिटमध्ये महिन्याला किमान १० लहान मुलांच्या शस्त्रक्रिया होतात. इतर युनिटमध्येही कमी-अधिक प्रमाणात शस्त्रक्रिया होतात, तर काहींना रेफर केले जाते.
प्रस्ताव देण्याची सूचना
पेडियाट्रिक सर्जरी विभागासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) प्रशासनाला केली आहे. घाटीत हा विभाग सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- डाॅ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
प्रस्ताव देणार
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी पेडियाट्रिक सर्जरी विभागाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आम्ही लवकरच प्रस्ताव सादर करणार आहोत.
- डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता