जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया ठप्पच; घाटीत उपचार पुन्हा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:02 AM2021-07-11T04:02:06+5:302021-07-11T04:02:06+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घाटी रुग्णालयातील थांबलेल्या शस्त्रक्रिया आणि उपचार पुन्हा एकदा सुरळीत ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घाटी रुग्णालयातील थांबलेल्या शस्त्रक्रिया आणि उपचार पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात मात्र, गेल्या दीड वर्षापासून शस्त्रक्रिया बंदच आहेत. या ठिकाणी दहा दिवसांपूर्वीच बाह्यरुग्ण विभागाची सेवा सुरू झाली. या ठिकाणी प्रसूती, सिझेरिअनसह नियमित शस्त्रक्रियांना कधी सुरुवात हाेते, याकडे रुग्ण, नातेवाइकांचे लक्ष लागले आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयात रूपांतरित झाले. त्यामुळे या ठिकाणी प्रसूती, सिझेरिअन, कान-नाक-घसा, हार्निया आदी शस्त्रक्रिया ठप्प झाल्या. कोरोना प्रादुर्भावात या ठिकाणी काही प्रसूती, सिझेरिअन प्रसूती झाल्या. परंतु अन्य शस्त्रक्रिया अद्याप सुरू झाल्या नाहीत. घाटीत मात्र, सर्व शस्त्रक्रियांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु डेल्टा प्लसचा धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी ७ दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात आंतररुग्ण विभाग सुरू करायचा की नाही, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
-----
-घाटी रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांवरही उपचार सुरू-५३
- जिल्हा रुग्णालयात सध्या रिकामे असलेले बेड्स-२९५
---------
कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया सुरू
१. घाटी रुग्णालय-पोटाच्या शस्त्रक्रिया, हार्निया, नेत्र, कान-नाक-घसा, अस्थिव्यंगोपचार, स्त्रीरोगसंदर्भातील शस्त्रक्रिया, कर्करोग नसलेल्या गाठी यासह विविध शस्त्रक्रिया.
२. शासकीय कर्करोग रुग्णालय - कर्करोगाशी संबंधित विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया
३. नेत्र विभाग, आमखास मैदान - मोतिबिंदू शस्त्रक्रिया
-----
घाटीत चांगले उपचार
घाटीत आईची मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाली. महिनाभरापूर्वी आलो होतो तेव्हा बंद होते, पण आता शस्त्रक्रिया झाली. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत घाटीत खूप चांगले उपचार मिळतात. त्यामुळे इथे आलो.
-नितीन केदार, रुग्णाचे नातेवाईक
--
खासगीत अधिक खर्च
घाटीत मावशीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी खासगी रुग्णालयात २० ते २५ हजारांचा खर्च येणार होता; परंतु घाटीत अवघ्या २० रुपयांत शस्त्रक्रिया झाली.
-अर्चना शेजवळ, रुग्णाचे नातेवाईक
--------
४ महिन्यांनंतर ‘सिव्हिल’ला सुरू झाली ओपीडी
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात ओपीडी बंद होती. डाॅक्टर्स दिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी येथील बाह्यरुग्ण विभागाची सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली.
- पहिल्या दिवशी ओपीडीत २० रुग्ण तपासण्यात आले, परंतु त्यानंतर ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली.
- दररोज ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५० पर्यंत पोहोचली आहे. सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळेत ओपीडी चालविली जात आहे.
सर्व नियमित शस्त्रक्रिया सुरू
घाटी रुग्णालयात नियमित शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णालयातील संपूर्ण ११७७ खाटा रुग्णांनी भरून जात आहे.
-डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय
---
कोरोनाशिवाय घाटीत गरिबांवर इतर उपचार
- कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील इतर उपचार बंद झाले; परंतु घाटीत कोरोनाशिवाय इतर उपचारही सुरळीत झाले.
- जिल्हा रुग्णालयातील ओपीडी बंद झाली होती, परंतु घाटीतील ओपीडी कोराेनाकाळातही सलग सुरू आहे.
- कोरोनाशिवाय इतर आजारांच्या उपचारासाठी गोरगरीब रुग्णांना घाटीचा मोठा आधार मिळाला. प्रसूती सेवाही घाटीत सुरळीत सुरू आहे.
-----
फोटो ओळ...
घाटी रुग्णालयातील नेत्र विभागात दाखल रुग्ण.