शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार
By संतोष हिरेमठ | Published: December 9, 2023 02:32 PM2023-12-09T14:32:32+5:302023-12-09T14:33:15+5:30
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना : तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया, उपचार करायची आहे, असे म्हटल्यावर ‘ थोडे थांबावे लागेल, सध्या सर्व्हर डाऊन आहे’, असे उत्तर गेल्या तीन दिवसांपासून सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेवर कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने ‘वाट पाहा, नाहीतर पैसे भरून उपचार घ्या’ अशी स्थिती रुग्णांची झाली आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्राची आरोग्य विमा योजना आहे. ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यातील २.२ कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. या योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येत आहे. प्रत्येक रुग्णालयात योजनेसाठी आरोग्यमित्र असतात. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.
‘ईटीआय’साठी धाडस होईना...
अत्यवस्थ रुग्णाला तत्काळ उपचार मिळण्यासाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’ची (ईटीआय) मदत घेतली जाते. ‘ईटीआय’ घेतल्यानंतर ७२ तासांच्या आत रुग्णाची आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व्हर ७२ तासांनंतरही सुरु झाले नाही तर रुग्णाकडून शुल्कची आकारणी करणे त्रासदायक ठरू शकते, हा विचार करून काही रुग्णालये ‘ईटीआय’पेक्षा ऑनलाइन यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.
किती रुग्णालये संलग्नित ?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३८ रुग्णालये एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.
घाटीत योजनेतून रोज किती रुग्णांवर उपचार?
एकट्या घाटी रुग्णालयात दररोज २० ते २५ रुग्णांवर या योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि अत्यावश्यक उपचार केले जातात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी, उपचारासाठी यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) अत्यवस्थ रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे घाटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
- योजनेत समाविष्ट उपचार संख्या- १,३५६
- केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार-११९
- राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची संख्या-१,३५०
‘ईटीआय’ने मदत
सर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, गंभीर रुग्णांसाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) माहिती कळवून उपचार केले जातात. लवकरच यंत्रणा सुरळीत होऊन कामकाज पूर्ववत होईल.
- डाॅ. मिलिंद जोशी, जनआरोग्य योजना जिल्हा व्यवस्थापक