छत्रपती संभाजीनगरमधील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अखेर मॅटकडून रद्द
By सुमित डोळे | Published: March 22, 2024 11:32 AM2024-03-22T11:32:35+5:302024-03-22T11:34:05+5:30
आता आणखी सोळा अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांपैकी चार पोलिस निरीक्षक तर एका सहायक निरीक्षकाची बदली मॅटने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) रद्द केली आहे. गुरुवारी न्या. व्ही. के. जाधव यांनी या प्रकरणी आदेश दिले. शिवाय, पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिकेविषयी कार्यवाहीकरिता कागदपत्रे द्विसदस्यीय खंडपीठाकडे पाठविण्याचेदेखील त्यांनी आदेशात नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका मतदारसंघात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले अधिकारी व मूळ जिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. २१ डिसेंबर रोजी आयोगाच्या आदेशानंतर राज्य पोलिस विभागात मोठा गोंधळ उडाला होता. काही विशेष पोलिस महानिरीक्षकांसह अधीक्षकांनी याबाबत राज्य पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. त्यानंतरही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु, राज्यभरातून अनेक पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांनी या निर्णयाविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती.
या अधिकाऱ्यांची बदली रद्द
शहरातून पाेलिस निरीक्षक अशोक गिरी, अविनाश आघाव, दिलीप गांगुर्डे, गणेश ताठे व सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. आघाव यांच्या बाजूने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे तर अन्य अधिकाऱ्यांच्या वतीने ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. शुक्रवारी याबाबत आदेश देताना त्यांची बदली रद्द केली. निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार २६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांची बदली झाली होती. ते सध्या अकार्यकारी पदावर कार्यरत असून, त्यांचा निवडणूक कार्य, सामान्य जनतेशी काही संबंध येत नसल्याचे निरीक्षक न्यायालयाने नोंदविल्याचे ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी सांगितले.
आता १४ अधिकाऱ्यांची मॅटमध्ये धाव
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या याचिकेनंतर मॅटने २७ फेब्रुवारी रोजी बदल्यांना स्थगिती दिली होती. मात्र, पोलिस आयुक्तालयामार्फत २९ फेब्रुवारी रोजी संबंधितांना कार्यमुक्त केले गेले. त्याविरोधात संबंधितांनी पुन्हा अवमान याचिकेसाठी अर्ज केला. याबाबत, न्यायाधिकरणाच्या २७ फेब्रुवारी रोजीच्या अंतरिम आदेशाचे पालन न केल्याने पोलिस आयुक्तांविरोधात अवमानविषयी कार्यवाहीकरिता कागदपत्रे द्विसदस्यीय खंडपीठाकडे पाठवावीत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. आता निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह जवळपास १४ पोलिस अधिकाऱ्यांनी बदल्यांविरोधात मॅटमध्ये धाव घेतली आहे.