वाळूज आरोग्य केंद्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 10:41 PM2019-07-05T22:41:07+5:302019-07-05T22:41:22+5:30
वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.
वाळूज महानगर : वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. वरिष्ठ अधिकाºयाच्या भेटीमुळे आरोग्य केंद्र लवकरच सुरु होण्याची आशा निर्माण झाली असून, पुढील आठवड्यात या आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाळूज परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेंतर्गत वाळूज येथे जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्च करुन ३० खाटांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. मात्र, अत्यावश्यक साहित्य व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने वर्षभरापासून आरोग्य केंद्राची इमारत धूळखात आहे. परिणामी वाळूजसह कमळापूर, रांजणगाव, लांझी, बकवालनगर, रामराई, नारायणपूर, जोगेश्वरी आदी भागातील रहिवाशाची गैरसोय होत आहे.
या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय घोलप आदींनी शुक्रवारी वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली.
यावेळी माजी सभापती मनोज जैस्वाल, चेअरमन सर्जेराव भोंड, उत्तम बनकर, डॉ. सुधाकर शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके, डॉ. महेश लड्डा, विनायक मुंडे, देशपांडे आदींची उपस्थिती होती.