चोवीस हजार कुटुंबांच्या सर्वेक्षणात १०५ जणांना गंभीर स्वरूपाच्या सहव्याधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:05 AM2021-06-04T04:05:37+5:302021-06-04T04:05:37+5:30
गंगापूर तालुक्यातील चित्र : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम, तातडीने दिले जाणार उपचार जयेश निरपळ गंगापूर : ‘माझे कुटुंब ...
गंगापूर तालुक्यातील चित्र : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम, तातडीने दिले जाणार उपचार
जयेश निरपळ
गंगापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यात सर्वेक्षण केले गेले. यात कोरोनासोबतच इतर आजाराची लक्षणं आहेत का, हे तपासले जात आहे. कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा, अशा सहव्याधी आहेत का, याचीदेखील माहिती संकलित केली जात आहे. तालुक्यात आतापर्यंत चोवीस हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले असून, यात १०५ गंभीर आजारांचे रुग्ण सापडले आहेत. अशा रुग्णांवर तातडीने उपचार दिले जाणार आहेत.
गंगापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोनशे सतरा गावांतील नागरिकांचे आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये ३० मेपर्यंत चोवीस हजार सहाशे सहा कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला, तर चार हजार पाचशे पंचावन्न कुटुंबांचे सर्वेक्षण बाकी आहे. सर्वेक्षणाकरिता ५८० पथकांची नेमणूक केली असून, यामध्ये शिक्षकांसोबतच स्थानिक ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा सेविकांचा समावेश आहे. सर्वेक्षणादरम्यान सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणं असलेले नऊ नागरिक आढळून आले, दमा, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे १०५ रुग्ण सापडले आहे, तर ऑक्सिजन ९५ टक्क्यांपेक्षा कमी असलेले १० जण सापडले आहे. सर्वेक्षणादरम्यान सहव्याधी असलेल्या गंभीर रुग्णांची व पाच कोरोना संशयितांची माहिती आरोग्य यंत्रणेला दिली गेली.
----
एकूण कुटुंब संख्या : २९१६१
-
कुटुंबांचे झाले सर्वेक्षण : २४६०६
सर्वेक्षणासाठीची पथके : ५८०
पथकातील कर्मचारी : २९००
----
सहव्याधी असलेल्या गावनिहाय रुग्णांची संख्या :
१) लासूर स्टेशन : १७
२) दिनवाडा : १४
३) झांजर्डी : ०९
४) माळीवाडा : ०७
५) पळसगाव : ०६
--
संबंधित रुग्णांना संपर्क करून त्यांची सर्वात आधी कोरोना चाचणी करण्यात येईल. पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात येतील. इतर आजारी व्यक्तींना तपासणी करून निगराणीखाली ठेवण्यात येईल, तर गंभीर आजारी व कर्करोगग्रस्तांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येईल, सर्व आजारांचा उपचार सरकारी खर्चातून करण्यात येणार आहे.
- डॉ. विवेक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी, गंगापूर.