संशयित नर्स तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:17+5:302021-05-23T04:04:17+5:30
औरंगाबाद : कोविड रुग्णांसाठी जीवदान देणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेली घाटी रुग्णालयातील कंत्राटी नर्स आरती ...
औरंगाबाद : कोविड रुग्णांसाठी जीवदान देणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेली घाटी रुग्णालयातील कंत्राटी नर्स आरती ढोले-जाधव ही तीन दिवसांनंतरही पोलिसांना सापडली नाही. यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकरला नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी घाटी रुग्णालयातील कोविड वॉर्डाचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी पोलिसांचे पथक घाटीत गेले होते.
गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी डमी ग्राहक पाठवून प्रतिनग २५ हजार रुपये दराने रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करणाऱ्या नितीन अविनाश जाधव आणि गौतम देवीदास अंगरक यांना १९ मे रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले होते. या कारवाईचा वेदांतनगर ठाण्याला रिपोर्ट देताना गुन्हेशाखेने आरोपी नितीनची पत्नी आरती ढोले हिचे आरोपी म्हणून नमूद केले होते. सहायक पोलीस निरीक्षक अनिल कंकाळ हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. आरोपी नर्स ही फरार होऊ शकते, ही बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही. परिणामी नितीन पकडला गेल्याचे कळताच त्याची पत्नी तेव्हापासून फरार झाली. आजपर्यंत तिचा कोणताही सुगावा पोलिसांना लागू शकला नाही.
======================
चार गुन्हे दाखल, तपास मात्र शून्य
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिवसरात्र करून रेमडेसिविर काळाबाजार करणाऱ्या तीन रॅकेटचा पर्दाफाश केला. याविषयी पुंडलिकनगर ठाणे, बेगमपुरा आणि वेदांतनगर ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले. बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात सात आरोपी दिल्यावर ते सर्वजण कोठडीत असताना तपास अधिकाऱ्यांना नाकाबंदी पॉइंटवर नेमल्यामुळे या गुन्ह्याचा तपास पुढे सरकला नाही. नवीन एकही आरोपी पोलिसांनी अटक केला नाही. पुंडलिकनगर ठाण्यात रेमडेसिविर काळाबाजाराची दोन गुन्हे नोंद आहे. एका गुन्ह्यात गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात दिल्यावर परभणी येथील नर्सच्या पतीला पकडले आणि तपास संपला.
चौकट
सिव्हिल हॉस्पिटलमधील इंजेक्शन चोरीचा गुन्हा
एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या फौजदाराला नाकाबंदीचे काम लावल्याने त्यांना या गंभीर गुन्ह्याचा तपास करता आला नाही. परिणामी हा तपास थंड बस्त्यात पडला. आता वेदांतनगर ठाण्यात दाखल रेमडेसिविर काळाबाजाराच्या गुन्ह्याच्या तपासात काय प्रगती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.