'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा'

By बापू सोळुंके | Published: September 1, 2023 09:13 PM2023-09-01T21:13:37+5:302023-09-01T21:15:18+5:30

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून तीव्र निषेध

Suspend Superintendent of Police who baton-charged Maratha protesters | 'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा'

'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा'

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला. या घटनेचा मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी तीव्र शब्दात निषेघ केला.सरकारकडून आरक्षणाची अपेक्षा असताना अशाप्रकारे लाठीहल्ला करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न निषेधार्थ असल्याच्या प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिल्या आहेत.

आंदोलन आणखी ताकदीने उभे राहील 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या पुरूष आणि माता भगिनींवर लाठी चार्ज केला आहे. आंदोलन दडपल्याने अजून ताकदीने ते उभे राहील. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहेत, त्यांनी संसदेत कायदा आणून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली पाहिजे. तसेच जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी सर्वस्वी सरकार जबाबदार असून पोलीस अधीक्षकांची असल्याने त्यांच्यावर  निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. 
- आ. अंबादास दानवे, विरोधीपक्षनेते, विधान परिषद.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध 
शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा बांधवावर झालेल्या लाठीहल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने जाहिर निषेध करतो.  संबंधित पोलीस अधीक्षकांना निलंबित केले पाहिजे.  राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय हा लाठी हल्ला पोलीस करू शकत नाही. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक  दडपशाही राज्यसरकार करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही निषेध करतो.  देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, न दिल्यास संभाजी ब्रिगेड आमच्या स्टाईलने धडा शिकवेल. यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार असेल.
- प्रा. शिवानंद भानुसे,प्रवक्ता,संभाजी ब्रिगेड.

उद्रेक होतच राहणार
मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या  आंदोलकांवर सरकारने केलेल्या लाठी हल्ल्याचा मी निषेध करतो.  मराठा आरक्षण कसे देणार, हे आधी राज्यसरकारने तातडीने स्पष्ट करावे अन्यथा  असा उद्रेक होतच राहणार. दुसरीकडे माझी मराठा समाज बांधवांना अशी विनंती आहे की आरक्षणाची लढाई आपण ज्या शांततामय आणि कायदेशीर मार्गाने लावून धरली होती, तशीच ती नेटाने लावून पुढे नेत राहू यात आपण तसूभरही मागे हटणार नाही.  मराठा आरक्षणाचे आंदोलन आपल्याला शांततेनेच करायचे आहे . या आंदोलनाला गालबोट  लागू देऊ नका,असे आवाहन आहे.
- विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक.

पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केला
मी सुरेश वाकडे, सखाराम काळे यांच्यासह साडेतीन वाजता आंतरवालीत पोहचलो, तेव्हा आंतरवाली गावाला पोलिसांनी वेढा दिलेला होता. आंदोलकांना दुपारी उचलण्याचा प्लॅन होता. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने  त्यांचे चेकअप केले. तेव्हा त्यांच्यावर मंडपातच उपचार सुरू झाले होते. यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी अचानक लाठीहल्ला सुरू केला. अश्रुधुरांच्या कांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. या लाठीहल्ल्याला आंदोलकांनी प्रत्यूत्तर दिले. 
- प्रा. चंद्रकांत भराट.

सर्वांना बडतर्फ करावे
जालना  जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आणि ज्यांनी लाठीचार्ज केला अशा सर्वांना बडतर्फ करावे. जालना येथे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणकर्त्यांवर गावकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. 
- अभिजीत देशमुख.

Web Title: Suspend Superintendent of Police who baton-charged Maratha protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.