औरंगाबाद झेडपीत भाजप सदस्य निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:18 AM2018-03-15T00:18:43+5:302018-03-15T00:19:03+5:30
परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आग्रह जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्वसाधारण सभेत धरला. अध्यक्षांचा हा आदेश दुर्लक्षित करीत सभागृहातील माईकवर आपले बोलणे सुरूच ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतील भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांना अध्यक्षांनी खाली बसण्यास सांगितले. तेव्हा चिडून जाऊन गायकवाड यांनी अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा, असा थेट आरोप अध्यक्षांवर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अध्यक्षांनी गायकवाड यांचे सदस्यत्व तडकाफडकी एक दिवसासाठी निलंबित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आग्रह जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्वसाधारण सभेत धरला. अध्यक्षांचा हा आदेश दुर्लक्षित करीत सभागृहातील माईकवर आपले बोलणे सुरूच ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतील भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांना अध्यक्षांनी खाली बसण्यास सांगितले. तेव्हा चिडून जाऊन गायकवाड यांनी अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा, असा थेट आरोप अध्यक्षांवर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अध्यक्षांनी गायकवाड यांचे सदस्यत्व तडकाफडकी एक दिवसासाठी निलंबित केले.
आज बुधवारी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होती. तत्पूर्वी, सकाळी अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी एका हॉटेलमध्ये जेवण दिले. या जेवणावर भाजप सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. तेव्हाच आजच्या सर्वसाधारण सभेत भाजप सदस्य सत्ताधाºयांना कात्रीत पकडणार असल्याची कुणकुण लागली होती. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू झाली. सुरुवातीला इतिवृत्ताच्या अनुपालनावर चर्चा सुरू झाली. तेव्हापासूनच भाजप सदस्य शिवाजी पाथ्रीकर, एल.जी. गायकवाड, मधुकर वालतुरे, किशोर पवार, पुष्पा काळे, सुरेश गुजराने यांनी सभागृहाला धारेवर धरले. मागील तीन महिन्यांपूर्वी आम्ही सर्व सदस्यांना निधी वाटपामध्ये समान न्याय द्यावा, पक्षपाती भूमिका घेऊ नका, असा आग्रह धरला होता. तेव्हा अध्यक्षा डोणगावकर यांनी यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांना निधीचे समान वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले होते. अद्यापही भाजपच्या ६ सदस्यांना विकासकामासाठी एक रुपयाही निधी दिलेला नाही, याचे सभागृहाला उत्तर द्यावे, असा आग्रह एल.जी. गायकवाड यांनी धरला. गायकवाड यांच्या आग्रहानुसार अर्थसभापती विलास भुमरे यांनी ३१ मार्चअखेरपर्यंत वंचित ६ सदस्यांना निधी देण्याचे आश्वासन दिले; परंतु भाजप सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पाथ्रीकर म्हणाले, तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. किशोर पवार, गुजराने यांनीही आरोप केले. एल.जी. गायकवाड म्हणाले, सदस्यांना सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. अध्यक्षा अधिकच संतापल्या व म्हणाल्या, सदस्यांना जसे अधिकार आहेत, तसे मलाही काही अधिकार आहेत. हे ऐकून गायकवाड यांनी अगोदर पतीची लुडबूड थांबवा व स्वत: निर्णय घ्या. हे वाक्य ऐकताच त्यांनी गायकवाड यांना एक दिवसासाठी निलंबित केले.
आरोप खोटा असेल, तर सिद्ध करा
एल.जी. गायकवाड यांना निलंबित केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभा तहकूब केली. पुन्हा ३.३० वाजता सभा सुरू झाली. तेव्हा भाजप गटनेते पाथ्रीकर, वालतुरे यांनी अध्यक्षांना विनंती केली. गायकवाड हे भावनेच्या भरात बोलले असावेत. आज अर्थसंकल्पीय सभा आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे; मात्र शेवटपर्यंत अध्यक्षा देवयानी पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्या म्हणाल्या, गायकवाड यांनी वैयक्तिक माझ्यावर आरोप केला आहे. माझ्या कौटुंबिक भावनेला त्यांनी हात घातला आहे. ही बाब सभागृहातील एकाही महिला सदस्यास पटलेली नाही. दरम्यान, मी केलेला आरोप खोटा असेल, तर सिद्ध करून दाखवावे, असे म्हणत गायकवाड यांनी सहकारी सदस्यांचा सभागृहात बसण्याचा आग्रह झिडकारत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.