नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडवणारा निलंबित सरकारी कर्मचारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 07:35 PM2020-11-24T19:35:11+5:302020-11-24T19:36:30+5:30
आरोपीस न्यायालयाने ठोठावली पोलीस कोठडी
औरंगाबाद: रेल्वे आणि यूथ इंटरनॅशनल स्काउट ॲण्ड गाईड मध्ये विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हेशाखेने सोमवारी रात्री अटक केली. अशोक साहेबराव वैद्य (२९, रा. जमनज्योती, हर्सुल ) असे आरोपीचे नाव आहे. तो नाशिक येथे शासकीय अंध मुलींच्या निवासी शाळेतील निलंबित कनिष्ठ काळजीवाहक आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार योगेश नामदेव गोरे (रा. पुष्पक गार्डन चिकलठाणा) हा पदव्युत्तर पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहे. गतवर्षी त्याची ओळख आरोपी वैद्यसोबत झाली होती. तेव्हा त्याने त्याची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याने त्याने अनेकांना टी. सी. पदी नोकरी लावल्याचे सांगितले. योगेशला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची मागणी केली. योगेशने पैसे देण्याची तयारी दर्शविली आणि लगेच टप्प्यात त्याच्या बॅंक खात्यात ५० हजार रुपये जमा केले.
यानंतर वैद्यने योगेश आणि अन्य एक तरुण अक्षय गायके यांना नियुक्तीपत्रे दिली आणि त्यांना त्याने दिल्ली येथे पाठवले. दोन दिवसाने तो तेथे आला. यानंतर बिहार मध्ये नेले. तेथे प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांना १५ दिवस ठेवले. यानंतर ते परतले. हा सगळा बनवाबनवीचा प्रकार असल्याचे समोर येताच योगेश आणि अक्षयने पैशाची मागणी केली. सुरवातीला आज उद्या करून टाळाटाळ करू लागला. त्यांनी जास्त तगादा लावल्यावर त्याने ४ लाख रुपये परत केले. आणि पाच उसनवारी पावती तयारी करून दिली. एक लाख रुपये नगदी देण्याचे सांगितले. मात्र त्याने पैसे दिले नाही. यासोबत त्याने जालना रोडवरील कुशलनगर येथे युथ इंटरनॅशनल स्काउट ॲण्ड गाईड चे कार्यालय थाटले. या कार्यालयातर्फे त्याने अनेकांना विविध पदाच्या नियुक्तीपत्रे देउन लाखो रुपये उकळून फसवणूक केली.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने झाली झटपट कारवाई
वैद्यने अनेकांना गंडविल्याचे समोर येताच योगेशसह सुमारे दहा जणांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची भेट घेऊन याविषयी तक्रार केली. आयुक्तानी दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यानी काल दुपारी त्याला ताब्यात घेतले. चौकशी नंतर त्याच्याविरुद्ध रात्री जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक करण्यात आली.
२७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
या गुंह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे येताच पोलीस निरीक्षक डी. एस. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अजय सुर्यवंशी, हवालदार विट्ठल मानकापे, महेश उगले यांनी त्याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.