सस्पेन्स कायम..!

By Admin | Published: January 31, 2017 12:06 AM2017-01-31T00:06:46+5:302017-01-31T00:07:21+5:30

उस्मानाबाद :उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असतानाही प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही

Suspens persists ..! | सस्पेन्स कायम..!

सस्पेन्स कायम..!

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असतानाही प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. उमेदवारीसाठी इच्छुकांची वाढलेली संख्या पाहून पक्षश्रेष्ठींनी याद्या जाहीर करण्याऐवजी शेवटच्या दिवशी निश्चित केलेल्या उमेदवाराला थेट ‘बी’ फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी प्रमुख पक्षांनी हे पाऊल उचलले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रमुख चारही पक्षांनी निवडणुकांची जय्यत तयारी केली. सेना-भाजपासह इतर पक्षांकडून प्रारंभी युती-आघाडीच्या चर्चा होत होत्या; मात्र, या चर्चा सुरू असतानाच या पक्षांनी दुसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू केली होती. राष्ट्रवादीने निवडणुका जाहीर झाल्यापासून स्वबळावर लढण्याचे अनेकवेळा स्पष्ट केले होते. त्यानुसार गण आणि गटनिहाय बैठकांवर बैठका सुरू होत्या. यावेळी इच्छुकांची सर्वाधिक पसंती राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच उमेदवाराची निवड करताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब या तालुक्यात एका जागेसाठी चार ते पाच तर काही मतदारसंघात त्याहून अधिक इच्छूक उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याने पक्षाने उस्मानाबाद पालिका निवडणुकीवेळी वापरलेल्या फॉर्म्युल्याचाच अवलंब यावेळीही करण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच दोन दिवस उरले असतानाही बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी थेट ‘बी’ फॉर्म देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. शिवसेनेकडेही इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबतच पालकमंत्री दिवाकर रावते आणि आ. तानाजी सावंत यांनी इच्छूक उमेदवारांशी गट आणि गणनिहाय चर्चा केली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक गटांमधील उमेदवारांचे नाव निश्चित झालेले नाही. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीनेही अखेरच्या दिवशीच नेमके उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार असल्याचे दिसून येते.
आ. बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरगा, लोहारा तालुक्यात काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर तुळजापूरसह उस्मानाबाद तालुक्यातील इच्छुक उमेदवारांशी आ. मधुकरराव चव्हाण यांनी संवाद साधलेला आहे. काँग्रेस जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढविणार असल्याने काही ठिकाणी आणखीनही उमेदवाराचा शोध सुरू आहे. तर ज्या ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना कामास लागण्याचे आदेश देण्यात आले असून, इच्छुकांची संख्या सर्वाधिक असलेल्या मतदारसंघातील उमेदवाराचा निर्णय १ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Suspens persists ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.