संस्थेकडून निलंबन, विद्यापीठाकडून गाईडशिप रद्द; लाच मागणाऱ्या ग्रंथपालावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 01:43 PM2024-08-21T13:43:42+5:302024-08-21T13:44:23+5:30

विद्यापीठ ग्रंथपाल पदाची मान्यता काढणार

Suspension from Institute, Cancellation of Guidance from BAMU University; Action taken against librarian asking for bribe | संस्थेकडून निलंबन, विद्यापीठाकडून गाईडशिप रद्द; लाच मागणाऱ्या ग्रंथपालावर कारवाई

संस्थेकडून निलंबन, विद्यापीठाकडून गाईडशिप रद्द; लाच मागणाऱ्या ग्रंथपालावर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पीएच.डी. (संशोधन) करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीतील ५० हजार रुपयांची मुलामार्फत लाच स्वीकारणाऱ्या डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयातील ग्रंथपाल तथा पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. एराज सिद्दिकी यांना संस्थेने तडकाफडकी निलंबित केले. विद्यापीठ प्रशासनाने त्यांची पीएच.डी. गाईडशिप रद्द करीत त्यांच्याकडील पीएच.डी.चे विद्यार्थी काढून घेतले आहेत. त्याशिवाय ग्रंथपालपदाची मान्यताही नियमानुसार रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास महाज्योती संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. या शिष्यवृत्तीमधील प्रतिमाह १० हजार रुपयांची लाच वेगवेगळ्या अहवालांवर सही करण्यासाठी मार्गदर्शक डॉ. एराज सिद्दिकी यांनी मागितली होती. त्यासाठी त्यांच्या वकील मुलासोबत चर्चा करण्यासाठी संशोधकास पाठविले. वकील मुलाने नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या चार वर्षांतील ४८ महिन्यांचे पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याचे ठरले.

संशोधक विद्यार्थ्यास लाच देणे मान्य नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने सोमवारी सापळा रचून ग्रंथपालाच्या दुसऱ्या मुलास ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. ग्रंथपाल सिद्दिकीला तब्बल प्रतिमहिना २ लाख ६७ हजार ५८८ रुपये एवढे वेतन असताना विद्यार्थ्यांकडून लाच घेत असल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता मंडळाची बैठक मंगळवारी (दि. २०) सकाळी घेण्यात आली. या बैठकीत डॉ. सिद्दिकी यांची पीएच.डी. गाईडशिप रद्द करण्यासह त्यांच्याकडे संशोधन करीत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना दुसरे गाईड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ग्रंथपाल पदासाठी विद्यापीठाने दिलेली मान्यता नियमांची तपासणी करून रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचेही प्रकुलगुरू सरवदे यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच एक लाख घेतले
डॉ. सिद्दिकी यांनी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या एका संशोधक विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्तीमधील अंतिम सही करण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याची माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित विद्यार्थ्यास तक्रार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे संबंधितांनी सांगितले.

Web Title: Suspension from Institute, Cancellation of Guidance from BAMU University; Action taken against librarian asking for bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.