विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी ACP विशाल ढुमेचे निलंबन; गृह विभागाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:54 PM2023-01-18T16:54:11+5:302023-01-18T17:10:50+5:30
एसीपीचे कारमध्ये महिलेशी अश्लील चाळे; पती आणि दीराला मारहाण, सासूलाही शिवीगाळ
औरंगाबाद: गेल्या शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद शहर एक खळबळजनक प्रकार घडला. पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याने दारुच्या नशेत धावत्या कारमध्ये मित्राच्या पत्नीशी अश्लील चाळे केले. यानंतर त्यांच्या घरी जाऊन पती, दीर आणि सासूलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यानंतर शहरात विशाल ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली. अखेर गृहविभागाने विशाल ढुमेचे निलंबन केले आहे.
महिलेच्या विनयभंगाप्रकरणी सोमवारी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ढुमेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. ढुमेने जामिनासाठी अर्ज सादर केला असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सोमवारी जामीन मंजूर केला.
यानंतर शहरात ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली. शहरातील नागरिकांसह खासदार इम्तियाज जलील आणि इतर लोकप्रतिनिधींनीही सरकारकडे विशाल ढुमेच्या निलंबनाची मागणी केली. अखेर आज गृह विभागाने आदेश काढून विशाल ढुमेला निलंबित केले आहे. शासन आदेशानुसार, 16 जानेवारीपासून ढुमेचे शासन सेवेतून निलंबन करण्यात आले आहे.
त्या रात्री काय घडलं?
पीडिता पती, मुलीसह सिडको परिसरातील पाम रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता जेवण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी सहायक आयुक्त विशाल ढुमे हे मित्रासह जेवणासाठी आले होते. पीडितेच्या पतीची ढुमेसोबत ओळख होती. यावेळी ढुमेनी पीडितेच्या पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. मध्यरात्री 1 वाजून 45 वाजता सर्व जण पोलिस आयुक्तालयाकडे निघाले. पीडिता समोरच्या सीटवर मुलीसह बसली होती, तर पती गाडी चालवत होता.
ढुमे मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी मागूनच पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. तेव्हा पीडितेने त्यास दूर लोटले. पोलिस आयुक्तालय आल्यानंतर ते न उतरता पीडितेच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर पीडितेच्या बेडरुममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह धरला. पीडितेच्या पतीने त्यांना समजावून सांगत घरी जाण्याची विनंती केली. मात्र, ढुमेने पीडितेच्या पतीला मारहाण केली. यावेळी ढुमेने इमारतीत खूप गोंधळ घातला. यानंतर पीडितेच्या पतीने 112 नंबरला फोन करुन पोलिस बोलावून घेतले. पोलिस कर्मचारी ढुमेला गाडीत घेऊन गेले.