औरंगाबाद बांधकाम विभागातील तीन शाखा अभियंत्यांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:56 PM2018-04-20T23:56:26+5:302018-04-20T23:59:11+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन शाखा अभियंत्यांचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबन केले आहे. पैठण तालुक्यातील १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत अनियमितता केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन शाखा अभियंत्यांचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबन केले आहे. पैठण तालुक्यातील १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत अनियमितता केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शाखा अभियंता बी. बी. जायभाये, बोईनवाड आणि पठाण यांचा त्यामध्ये समावेश आहे. अन्य एका अभियंत्याला या प्रकरणात क्लीन चीट देण्यात आल्याची चर्चा आहे.
लोकमतने याप्रकरणी वारंवार वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला होता. पैठण तीर्थक्षेत्र प्राधिकरणासाठी शासनाने दिलेल्या २०० कोटींपैकी १६ कोटींतून करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांत चालढकल करीत देखरेख केली. परिणामी ते रस्ते पूर्णत: उखडले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील कामांची पाहणी केली होती. पाच कंत्राटदारांपैकी ३ कंत्राटदारांनी केलेल्याकाँक्रीटच्या रस्त्यांना पूर्णत: तडे गेले. ती कामे निकृष्ट झाल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यांनी शाखा अभियंत्यांवर १० ठपके ठेवले. कामाचे सुपरव्हिजन योग्य रीतीने झाले नाही. त्या अनुषंगाने तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला. नोटीस दिल्यानंतर सर्व अभियंते खडबडून जागे झाले. त्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे नोटीसचा खुलासा केला, तो समाधानकारक नसल्यामुळे शाखा अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठविण्यात येणार आहे. तसेच बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाºया रस्त्यांलगत फोर-जी इंटरनेट केबल टाकण्यासाठी खोदकामापोटी मिळालेली रक्कम पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्च करण्यात आली. विशेष म्हणजे ही कामे कागदावरच उरकून तब्बल ६ कोटी रुपयांची गडबड करण्यात आली होता. या प्रकरणातही शाखा अभियंता, कार्यकारी अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान तत्कालीन मुख्य अभियंत्यांनी तीर्थक्षेत्र प्राधिकरण कामांचे अंदाजपत्रक चुकीचे असताना मंजूर केले होते. त्यामुळे निलंबित करण्यात आलेले तिन्ही अभियंता कारवाईच्या निर्णयाविरोधात ‘मॅट’मध्ये जाण्याची शक्यता आहे.
निलंबन होऊ नये यासाठी दबाव
शाखा अभियंत्यांचे निलंबन होऊ नये, यासाठी बांधकाम विभागातील वरिष्ठांवर राजकीय दबाव आणला गेल्याचे वृत्त आहे. पैठण तालुक्यात वेगवेगळ्या टप्प्यात केलेली कामे निकृष्ट झाली. तसेच फोर-जीच्या खोदकामातून मिळालेली रक्कमही त्याच तालुक्यात वापरली गेली. सगळ्या कारवाईचा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.