विद्यापीठाच्या कुलसचिव साधना पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:43 PM2018-06-15T20:43:15+5:302018-06-15T20:43:59+5:30
कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावापुढे महाराज हा शब्द वापरल्याने सदस्यांनी यावर आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली
औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी आज निवडणूक होती. यासाठी सकाळी अधिसभेच्या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावापुढे महाराज हा शब्द वापरल्याने सदस्यांनी यावर आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. बैठकीत यावरून प्रचंड गदारोळ झाल्याने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी त्यांना निलंबित केले.
व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अधिसभेच्या बैठकीला सुरुवात होताच कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे महाराज असा उल्लेख केला. महाराज शब्दावर प्रा. सुनिल मगरे यांनी आक्षेप घेत बाबासाहेबांना देव, राजा बनविण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. याची सुरुवात बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातुन होत असल्यामुळे असा उल्लेख करणाऱ्या कुलसचिवांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर प्रचंड गदारोळ झाला. शेवटी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी डॉ. पांडे यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा करत त्यांना सभागृहाबाहेर काढले.
मात्र, विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी डॉ. पांडे यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी लावून धरली. तेव्हा ती मान्य झाल्यामुळे डॉ. पांडे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. तसेच दुपारच्या सत्रानंतर कामकाजात सहभागही नोंदवला.