दोन शिक्षकांवर संशयाची सुई
By Admin | Published: February 14, 2016 11:52 PM2016-02-14T23:52:46+5:302016-02-15T00:19:45+5:30
बीड : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) बहुचर्चीत पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांची नावे समोर येत आहेत. दोन्ही संशयित शिक्षक गायब आहेत
बीड : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) बहुचर्चीत पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांची नावे समोर येत आहेत. दोन्ही संशयित शिक्षक गायब आहेत. शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट शिक्षकांपर्यंत येऊन पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
राज्य शिक्षण परीक्षा परिषदेच्या वतीने १६ जानेवारी रोजी राज्यभर एकाचवेळी टीईटी परीक्षा झाली. पहिल्या सत्रात पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या १८ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोशल मीडियावरुन व्हायरल झाली होती. व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका जि.प. सीईओ नामदेव ननावरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांच्या व्हॉटस्अॅपवर धडकली होती. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.
याप्रकरणी संतोष पवार यास पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या व्हॉटस्अॅपवर एका शिक्षकाने प्रश्नपत्रिका ‘फॉरवर्ड’ केली होती, असे तपासात पुढे आले आहे. पेपरफुटी प्रकरणाच्या ‘पापा’त आणखी एक शिक्षकाने त्याला ‘साथ’ दिलेली आहे. यापैकी एक जि. प. च्या बीडमधीलच शाळेत कार्यरत असून तो या प्रकरणापासून रजा न टाकता गायब आहे. दुसरा शिक्षक एका खासगी संस्थेतील शाळेत नोकरी करतो.
पेपरफुटीसारख्या प्रकरणात शिक्षकांचीच नावे समोर येत असल्याने त्यांना ‘आदर्श’ कसे म्हणावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने उडालेला धुराळा जमिनीवर टेकलाही नाही तोच पेपरफुटीत शिक्षकांचे हात गुंतल्याचे पुढे येत असल्याने शिक्षण वर्तुळ हादरुन गेले आहे. पेपर कसा फोडला हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)