आरक्षण सोडतीवर संशयाचे मळभ; नवीन वॉर्डांसाठी जुन्या आरक्षणाचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:51 AM2020-02-05T11:51:56+5:302020-02-05T12:19:27+5:30

शहरातील २० राजकीय नेत्यांना समोर ठेवून वॉर्ड रचना तयार करण्यात आल्याचा आरोप

Suspicion of ward reservation; Old reservation criteria for new wards in Aurangabad | आरक्षण सोडतीवर संशयाचे मळभ; नवीन वॉर्डांसाठी जुन्या आरक्षणाचे निकष

आरक्षण सोडतीवर संशयाचे मळभ; नवीन वॉर्डांसाठी जुन्या आरक्षणाचे निकष

googlenewsNext
ठळक मुद्दे११५ पैकी १०० वॉर्ड कोणताही ड्रॉ न काढता घोषित करण्यात आले. फक्त १५ वॉर्डांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या सोडतीमुळे मनपाच्या इतिहासात प्रथमच सोडत पद्धतीवर संशयाचे दाट मळभ पसरले आहे. शहरातील २० राजकीय मंडळींना डोळ्यासमोर ठेवून वॉर्ड नवीन पद्धतीने तयार करण्यात आले. आरक्षण टाकताना मागील निकष डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ओळीत एकाच प्रवर्गाचे आरक्षण पडते कसे, असा संतप्त सवाल आता राजकीय मंडळींकडून उपस्थित करण्यात येत आहे.

११५ पैकी १०० वॉर्ड कोणताही ड्रॉ न काढता घोषित करण्यात आले. फक्त १५ वॉर्डांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. निवडणूक आयोग, महापालिकेने ही कोणती नवीन पद्धत शोधून काढली, असा सवालही आता उपस्थित होत आहे. ‘सब कुछ मॅनेज’ असलेल्या सोडतीआधीच आरक्षणाची माहिती बाहेर आल्याने गोपनीयतेचाही भंग झाला आहे. त्यामुळे आता या सोडतीविरोधात काही जणांनी खंडपीठात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान महापालिका वॉर्डांची रचना जाहीर करण्याआधीच त्या रचनेसंबंधी  नागरिकांचे असलेले आक्षेप मागविण्यात यायला हवे होते आणि त्यानंतर वॉर्डांचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

शंकेला वाव, कारण...
राजू शिंदे यांचा एमआयडीसी चिकलठाणा हा वॉर्ड मागील वेळी अनूसूचित जातीसाठी आरक्षित होता. यंदा वॉर्ड खुला होणे अपेक्षित होते. आयोगानेही मागील आरक्षणे डोळ्यासमोर ठेवून आरक्षणे टाकली, असा दावा केला आहे. मग शिंदे यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी पुन्हा राखीव ठेवताना अधिकाऱ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती का? असा संतप्त सवाल वॉर्डातील इच्छुक उमेदवार करीत आहेत. सातारा-देवळाई भागातील सर्व पाचही वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत.

एकाच ओळीत पाच वॉर्ड 
एकाच ओळीत पाच आरक्षणे आल्यावर आयोगाने लक्ष दिले नाही का? महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन यांचे वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच राखीव असतील. हे आरक्षणही सोयीनुसार टाकल्याची चर्चा आहे. विष्णूनगर वॉर्ड मागील वेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होता. यंदा तो पुन्हा खुल्या प्रवर्गातील महिलांसाखी कसा राखीव होऊ शकतो? या वॉर्डातील नऊ मतदारांचे ब्लॉक उचलून उत्तमनगर, रमानगर आदी वॉर्डांना कशासाठी जोडले? माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा उत्तमनगर-बौद्धनगर वॉर्ड खुला करण्यासाठीच का? असा सवाल विष्णूनगरचे नागरिक करीत आहेत.

ओळीने आरक्षित केलेले वॉर्ड
हर्सूल (सर्वसाधारण महिला), भगतसिंनगर-म्हसोबानगर (सर्वसाधारण महिला), चेतनानगर-राजनगर (ओबीसी- महिला), पहाडसिंगपुरा-बेगमपुरा (ओबीसी-महिला), मयूर पार्क-हरसिद्धीनगर (अनुसूचित जाती-महिला), सुरेवाडी (अनुसूचित जाती- महिला), नारेगाव पश्चिम (सर्वसाधारण-महिला), सावित्रीनगर-चिकलठाणा (सर्वसाधारण- महिला), खडकेश्वर (ओबीसी-महिला), गुलमंडी (ओबीसी-महिला), गणेशनगर (ओबीसी-महिला), रहेमानिया कॉलनी (ओबीसी-महिला), आविष्कार कॉलनी (सर्वसाधारण -महिला), गुलमोहर कॉलनी (सर्वसाधारण- महिला), रामनगर (सर्वसाधारण-महिला), विठ्ठलनगर (सर्वसाधारण-महिला), विश्रांतीनगर (सर्वसाधारण-महिला), गजानननगर (सर्वसाधारण -महिला), कबीरनगर (सर्वसाधारण -महिला), वेदांतनगर (सर्वसाधारण -महिला), बन्सीलालनगर (सर्वसाधारण -महिला).

मोजक्याच वॉर्डांमध्ये सेटिंग
शहरातील ११५ वॉर्डांमध्ये सेटिंग झाली नाही. मोजक्याच १५ ते २० वॉर्डांमध्ये सेटिंग केल्याचे उघडपणे लक्षात येत आहे. त्यांच्यामुळे इतर ३० ते ४० वॉर्ड विस्कळीत करण्यात आले हे सुद्धा निदर्शनास येत आहे. या प्रक्रियेत जेवढी पारदर्शकता असायला हवी ती ठेवण्यात आली नाही. 
- रशीद मामू, माजी महापौर. 

न्यायालयात जाणारच 
विष्णूनगर वॉर्डाची लोकसंख्या मागीलवेळी ९ हजार ६८७ होती. मनपाला वॉर्ड दहा हजारांचा करायचा होता. ३१३ मतांसाठी संपूर्ण वॉर्डाची तोडफोड कशासाठी करण्यात आली. विष्णूनगर वॉर्डाची आता एकच मूळ गल्ली या वॉर्डात शिल्लक आहे. वॉर्डाचे चार तुकडे केले. चार नगरसेवक या वॉर्डांचा विकास तरी करणार आहेत का? या बोगस प्रक्रियेला खंडपीठात आव्हान देण्यात येणार आहे.
-अभय भोसले, विष्णूनगर, नागरिक

Web Title: Suspicion of ward reservation; Old reservation criteria for new wards in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.