बालिकेचा संशयास्पद मृत्यू; आईवर संशय
By Admin | Published: May 20, 2014 01:21 AM2014-05-20T01:21:14+5:302014-05-20T01:32:53+5:30
वाळूज महानगर : सात महिन्यांपूर्वी वाळूज परिसरातील शिवराई शिवारात एक महिन्याच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
वाळूज महानगर : सात महिन्यांपूर्वी वाळूज परिसरातील शिवराई शिवारात एक महिन्याच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी आज तिच्या आईलाच ताब्यात घेतले. त्यामुळे या गंभीर घटनेला कलाटणी मिळाली आहे. दिलीप लक्ष्मण कर्जुले हा पत्नी चंदाबाई आणि दोन लहान मुलींसह नवीन शिवराईत वास्तव्यास आहे. ६ आॅक्टोबर-२०१४ रोजी दिलीप रात्री कामासाठी कंपनीत गेला होता. घरातील एका खोलीत दिलीप यांचे आई-वडील व भाऊ, तर दुसर्या खोलीत चंदाबाई दोन्ही मुलींसोबत झोपली होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास चंदाबाई ही घराचा दरवाजा उघडून शौचासाठी बाहेर पडली. परत आल्यानंतर चंदाबाई पुन्हा झोपली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास झोक्यात एक महिन्याची मुलगी गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. ७ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चंदाबाईने वाळूज पोलीस ठाण्यात मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास दिलीप कर्डिले यांच्या घराच्या पाठीमागे काटेरी झुडपात गायब झालेल्या लहान मुलीचा जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयाची सुई आईकडे एक महिन्याच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी वाळूज पोलिसांनी चंदाबाई कर्डिले हिला संशयावरून आज १९ मे रोजी ताब्यात घेतले. रासायनिक विश्लेषण तज्ज्ञाच्या अहवालानुसार चंदाबाईच्या अंगावरील कपड्यांना रॉकेलचा वास येत होता. आता तिच्याकडून कोणती माहिती बाहेर येते याकडे वाळूज पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.