तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अंगावर रक्त, कंबरेला अर्धवट जळालेल्या उदबत्तीने गूढ वाढले
By सुमित डोळे | Published: September 15, 2023 12:03 PM2023-09-15T12:03:59+5:302023-09-15T12:04:39+5:30
ऐन अमावास्याच्या रात्री उघडकीस आलेल्या घटनेमुळे परिसरात जादू टोण्याची चर्चा
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मसनतपूरमध्ये राहणाऱ्या गौतम मगरे (३९) यांचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. रात्री कामावरून परतल्यानंतर झोपलेले गौतम सकाळी अचानक मृतावस्थेत आढळले. परंतु त्यांच्या अंगावर रक्त, त्याला लागलेल्या मुंग्या व कंबरेला अर्धवट जळालेल्या उदबत्तीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवला. दरम्यान, ऐन अमावास्याच्या रात्रीच हा प्रकार घडल्यामुळे परिसरात जादू टोण्याची चर्चा जोरात सुरू झाली होती.
रामनगरातील रंगाच्या दुकानात काम करणारे गौतम दोन वर्षांपूर्वीच त्यांना पत्नी सोडून गेल्याने भावाच्या घराशेजारील खोलीत एकटेच राहत होते. बुधवारी रात्री कामावरून घरी उशिरा परतले. घरी जाताच ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी बराच वेळ होऊनही गौतम बाहेर न आल्याने भावाने दरवाजा ढकलून पाहिले असता धक्कादायक चित्र दिसले. गौतम बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यांचा आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली.
अंगावर रक्त कोणाचे? उदबत्ती कशी?
गौतम यांच्या अंगावर एकही जखम आढळली नाही. मात्र, हात, पाय, चेहऱ्यावर रक्त आढळले. ते एखाद्या प्राण्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रक्तामुळे त्यांच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. कंबरेच्या पॅण्टच्या हुकमध्ये उदबत्ती अडकवलेली होती. संशयास्पद वाटल्याने पहिले एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गौतम यांना तपासून मृत घोषित केले. मात्र, शवविच्छेदनाचा अहवालात मृत्यूचे कारण तज्ज्ञांच्या मतासाठी राखीव ठेवले.