संशयकल्लोळ! भूमी अभिलेखमधील लाचखोरांची महत्त्वाच्या जागांवर पोस्टिंग
By विकास राऊत | Published: March 24, 2023 07:17 PM2023-03-24T19:17:16+5:302023-03-24T19:18:05+5:30
अंतर्गत खदखद : काही जागा रिक्त ठेवल्यामुळे संशयकल्लोळ
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील भूमी अभिलेख विभागातील ३९ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या गेल्या आठवड्यात झाल्या असून त्यात लाचखोरीमुळे निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या जागांवर पोस्टिंग देण्यात आल्यामुळे विभागाअंतर्गत खदखद वाढल्याची चर्चा आहे. या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपही झाल्यामुळे काही जागा रिक्त ठेवण्यात आल्याने संशयकल्लोळ वाढला आहे. या सगळ्या कारभाराबाबत विभागातील अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे.
१० मार्च रोजी मराठवाड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना या जिल्ह्यांतील ३९ जागा पदोन्नतीने भरण्यासाठी प्रभारी भूमी अभिलेख उपसंचालक एस.पी.घोंगडे यांच्या स्वाक्षरीने आदेश निघाले. १३ मार्च रोजी यातील अनेकजण रुजू झाले नाहीत. १४ मार्चपासून संप सुरू झाल्यामुळे रुजू करून घेण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. परिरक्षण भूमापक, निमतानदार, कनिष्ठ लिपिक, भूमापक इ. संवर्गातील रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यासाठी आदेश निघाले. पदोन्नती करण्यात आलेल्यांना तातडीने रुजू होण्यासाठी सांगण्यात आले, कारण या प्रकरणात अनेकांनी मॅटचा दरवाजा ठोठावल्याची शक्यता आहे. याबाबत उपसंचालक घोंगडे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. आस्थापना अधिकारी संतोष काशीद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही नियमित प्रक्रिया आहे, यात काहीही अनियमितता नाही.
व्याधीग्रस्तांचाही केला नाही विचार
पदोन्नती करताना व्याधीग्रस्त कर्मचाऱ्यांचा काहीही विचार केला नाही. त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्टिंग देणे गरजेचे असताना त्यांना येथून लांबच्या जिल्ह्यात पोस्टिंग दिली आहे. ३९ पदोन्नतीच्या प्रस्तावात १ जागा जास्तीची वाढविण्यात आली आहे. मर्जीतील कर्मचाऱ्यांसाठी ही उठाठेव केल्याचे बोलले जात आहे. यातील तीन कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकले होते. ते निलंबित होते, निलंबन संपताच त्यांना छत्रपती संभाजीनगर मुख्यालयात पोस्टिंग देण्यात आली आहे. काही जागा मर्जीतल्या व्यक्तींसाठी रिक्त ठेवण्यात आल्या असून या सगळ्या प्रकरणात काही जण ‘मॅट’मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.