अवकाळीचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2016 10:59 PM2016-03-02T22:59:07+5:302016-03-02T23:10:40+5:30
बीड : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी बुधवारी अवकाळी पावसाने हाहाकार उडाला. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
बीड : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी बुधवारी अवकाळी पावसाने हाहाकार उडाला. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शिरूर कासार तालुक्यात एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. आष्टी, बीड, अंबाजोगाई तालुक्यात वीज कोसळून गुरे दगावली. घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांना बेघर व्हावे लागले. पहिल्या तडाख्यातून छावण्या पुरत्या सावल्या नव्हत्या तोच पुन्हा गुरांच्या डोक्यावरील छप्पर हिरावले.
सकाळपासूनच आकाशात काळे ढग जमले होते. वातावरणात उष्णताही जाणवत होती. दुपारनंतर जोरदार वारे वाहू लागले. पावसामुळे गेवराई येथील आठवडी बाजारात पाणीच-पाणी साचले होते. त्यामुळे बाजारकरूंची फजिती झाली.
परळी तालुक्यातील सिरसाळा, बीड तालुक्यातील चौसाळा, हिंंगणी बुद्रुक, नागझरी, केत्तुरा तर शिरुर, केज, धारुर तालुक्यालाही पावसाने झोडपले. शिरुरकासार तालुक्यातील रायमोहा येथील अनिस शेख यांच्या घरावरील २५ पत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत करण्याची मागणी भाजपचे गोकूळ सानप यांनी केली आहे.
कडब्यासह गहू काळवंडला
रबी हंगामातील ज्वारीची काढणी झाली असली तरी कडबा शेतातच पडून आहे. तर गव्हाचे पीक काढणीला आलेले असतानाच अवकाळीचा मारा झाला आहे. त्यामुळे गव्हाची पडझड झाली.
सात गुरे दगावली
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे गोठ्यावर वीज पडून पाच गुरे दगावली. शिवाय बीड तालुक्यातील नेकनूर येथील छावणीत विजेने गायीचा बळी घेतला. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडल्याने मळणीयंत्र घेऊन निघालेले शिवाजी दशरथ बिरंगळ जखमी झाले. एक बैल दगावला. (प्रतिनिधी)