सुविधा केंद्राचे आमिष दाखवून साडेपाच लाखाला गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:03 AM2021-03-19T04:03:27+5:302021-03-19T04:03:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सीएमएस कंपनीचे अहस्तांतरणीय सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तिघांकडून साडेपाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सीएमएस कंपनीचे अहस्तांतरणीय सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तिघांकडून साडेपाच लाख रुपये घेऊन त्यांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.
सय्यद फहाद असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१०पासून सुरु होता. शेख मलिक अहेमद शेख मुश्ताक अहेमद (३२, रा. सुभेदारी गेस्ट हाऊसमागे) याची २००७मध्ये सय्यद फहाद याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी सय्यद फहाद याचे शहा बाजार येथे ग्लोबल सेतू सुविधा केंद्र होते. या ओळखीतून सय्यद फहाद याला सीएमएस कंपनीकडून सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे टेंडर मिळाले होते. ते तुम्हाला हस्तांतरित करतो, असे शेख मलिक याला आमिष दाखवले. त्यासाठी त्याने शेख मलिककडून अडीच लाख रुपये घेतले होते. मुळात सेतू सुविधा केंद्र हस्तांतरित केले जात नाही, याची माहिती शेख मलिक याला नव्हती. सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी घेणार असल्याची माहिती शेख मलिक याने आपले मित्र सय्यद मेहराज व शेख अफरोज यांना दिली होती. त्या संदर्भात शेख मलिक याने मेहराज व अफरोज या दोन मित्रांची भेट सय्यद फहादशी घालून दिली. त्यांनादेखील फहादने सेतू सुविधा केंद्र चालविण्यास देतो, असे सांगून त्या दोघांकडूनही प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले. तिघांकडून तब्बल साडेपाच लाख रुपये घेतल्यानंतर आज-उद्या करत आजपर्यंत फहादने शेख मलिक व त्याच्या दोन मित्रांना सुविधा केंद्र चालविण्यासाठी दिले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख मलिकने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, उपनिरीक्षक तांगडे तपास करत आहेत.