‘स्वाधार’ शिष्यवृत्तीचा पेच सुटेना; निधी पडून, ‘व्हीपीडीए’साठी कागदपत्रांची प्रतीक्षा
By विजय सरवदे | Published: June 13, 2024 12:15 PM2024-06-13T12:15:09+5:302024-06-13T12:15:49+5:30
साडेचार हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागायची. आता समाजकल्याण कार्यालयाकडे तीन महिन्यांपासून निधी पडून आहे, पण ही शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ‘व्हीपीडीए’ या नवीन प्रणालीसाठी विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रेच मिळेनात. त्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली आहे.
आता या शिष्यवृत्ती योजनेसाठी दोन महिन्यापूर्वी शासनाने काही तांत्रिक बदल केले आहेत. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या खात्यावर जमा व्हायची, ती आता थेट कोषागार कार्यालयात ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाैंट’मध्ये (व्हीपीडीए) जमा होणार आहे. सध्या समाज कल्याण विभागामार्फत हे ‘व्हीपीडीए’ हे खाते तयार केले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक केलेले पॅनकार्ड आणि आधारकार्ड, कॅन्सल चेक जमा करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे चेक नाही, त्यांनी बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जमा केली तरी चालते. मात्र, सध्या काही विद्यार्थ्यांनी पाेस्टल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडियाचे पासबुक जमा केले आहेत. पण, या तिन्ही बँकांचे ‘आयएफसी’ कोड हे ‘व्हीपीडीए’ खात्याशी जुळत नाहीत. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांकडूनच कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित ३ हजार विद्यार्थ्यांनी अजूनही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयासमोर या शिष्यवृत्तीचा पेच निर्माण झाला आहे.
आता समाज कल्याणलाच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा
शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चे नियमित विद्यार्थी तसेच तत्पूर्वीच्या वर्षात त्रुटीत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे मार्चअखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यांना ‘व्हीपीडीए’ प्रणालीद्वारेच स्वाधार शिष्यवृत्ती देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स एवढी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, पाेस्टल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया या बँकांत खाते असेल, तर त्याऐवजी दुसऱ्या बँकेत खाते उघडून संबंधित कागदपत्रे विनाविलंब सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याणच्या जिल्हा कार्यालयाने केले आहे.