हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत
By स. सो. खंडाळकर | Published: March 7, 2024 01:57 PM2024-03-07T13:57:32+5:302024-03-07T14:00:41+5:30
शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेली साठ वर्षे डॉ. स्वामीनाथन यांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते हयात असतानाच त्यांना भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी भावना त्यांच्या कन्या डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी सायंकाळी त्या सीटू भवनात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. मधुरा स्वामीनाथन या राष्ट्रीय सांख्यिकी संस्था बंगळूर येथे अर्थशास्त्रीय मूल्यमापन विभागप्रमुख आहेत. माजलगाव येथे किसान सभेच्या वतीने आयोजित किसान मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी त्या रवाना होतील.
त्यांनी सांगितले की, या देशातील ४० टक्के छोटे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना एमएसपीच माहीत नाही.
भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत मधुरा म्हणाल्या, सरकार बदलल्याने खूप काही फरक पडू शकेल. शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार थेट मदत पाठवते, याकडे लक्ष वेधताच त्यांनी सागितले की, जी रक्कम पाठवली जाते, ती तुटपुंजी आहे.
आगामी काळात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करू शकाल काय, असे विचारता त्या म्हणाल्या, मुळीच नाही. पण या आंदोलनांना मदत करण्याची माझी भूमिका राहील. या पत्रपरिषदेस माकपचे सचिव कॉ. भगवान भोजने व सेल्वन डॅनियल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.